नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय राजधानीतील डझनहून अधिक शाळांना सोमवारी बॉम्बच्या धमकीचे ई-मेल मिळाले. खलिस्तान नॅशनल आर्मी या दहशतवादी संघटनेकडून ही धमकी आल्याचे ई-मेलमध्ये नमूद केले होते. दिल्ली खलिस्तान बनेल. पंजाब खलिस्तान आहे, संसदेत 13 फेब्रुवारी रोजी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकीही यात देण्यात आली होती.
यामुळे राजधानीतील सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले. खबरदारी म्हणून शाळाही रिकाम्या करण्यात आल्या. या धमक्या नंतर खोट्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांसह सर्वांनीच निःश्वास टाकला. अफझल गुरूच्या नावाचा उल्लेख ई-मेलमध्ये होता. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.11 वाजता संसदेत स्फोट होईल, असा दावाही करण्यात आला होता.