पोर्ट ब्लेअर : मलेशियाच्या दिशेने जाणारी प्रवाशांची एक बोट अंदमान समुद्रात उलटली आहे. या दुर्घटनेत 250 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. या बोटीतून शेकडो लोक बेकायदेशीररीत्या प्रवास करत होते. यामध्ये बहुतांश स्थलांतरित मजूर आणि बांगला देशी नागरिकांचा समावेश होता. यातील बहुतांशी रोहिंग्या आणि बांगला देशी नागरिक आहेत.
या घटनेत आतापर्यंत किमान 9 जणांना वाचवण्यात यश आले आहे. बांगला देश कोस्ट गार्डकडून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. बांगला देशी वृत्तपत्र ‘द डेली स्टार’च्या अहवालानुसार, या बोटीवर स्थलांतरित (बहुतांश रोहिंगे) आणि बांगला देशी नागरिकांसह सुमारे 250 ते 280 लोक होते.
असे सांगितले जात आहे की, ही बोट अनेक दिवस समुद्रात राहिल्यानंतर उलटली. या भागातील गस्तीवर असलेल्या जहाजाने समुद्रातून 9 जणांना वाचवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. बांगला देश कोस्ट गार्डचे मीडिया अधिकारी लेफ्टनंट सब्बीर आलम सुजन यांनी एका प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली की, ‘एमटी मेघना प्राईड’ नावाचे बांगला देशी ध्वज असलेले जहाज चटगावहून इंडोनेशियाकडे जात असताना हा प्रकार लक्षात आला.