श्रीहरिकोटा: भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) बुधवारी (दि.२४ डिसेंबर) सकाळी ८:५४ वाजता श्रीहरिकोटा येथून एका महत्त्वाच्या मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे. LVM3-M6 या शक्तिशाली रॉकेटद्वारे अमेरिकेचा 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' (BlueBird Block-2) हा अत्याधुनिक दळणवळण उपग्रह अवकाशात सोडला जाणार आहे.
'ब्लूबर्ड ब्लॉक-२' हा भारतीय भूमीतून प्रक्षेपित केला जाणारा आतापर्यंतचा सर्वात जड (सुमारे ६,१०० किलो) उपग्रह आहे. हा उपग्रह अंतराळातून थेट तुमच्या स्मार्टफोनला 4G आणि 5G इंटरनेट सेवा देण्यास सक्षम आहे. यामुळे दुर्गम भागातही कॉल, इंटरनेट आणि व्हिडिओ सेवा विनाअडथळा मिळतील. ही पूर्णपणे व्यावसायिक मोहीम असून, इस्रोची व्यावसायिक शाखा 'न्यूस्पेस इंडिया लिमिटेड' (NSIL) आणि अमेरिकेची 'एएसटी स्पेसमोबाईल' यांच्यातील करारानुसार ही पार पडत आहे.
ज्या रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण होणार आहे, त्याच LVM3 रॉकेटने यापूर्वी भारताच्या चंद्रयान-२, चंद्रयान-३ आणि 'वनवेब' सारख्या महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीपणे फत्ते केल्या आहेत. उद्याची ही मोहीम इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी ठरेल, असेही इस्रोने म्हटले आहे.