Black carbon causes snow peaks to melt
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हिमालयीन ग्लेशियरच्या वितळण्याच्या वाढत्या गतीमागे ब्लॅक कार्बनचे मोठे योगदान असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. गेल्या दोन दशकांत हिमालयातील बर्फाच्या पृष्ठभागाच्या तापमानात 4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ब्लॅक कार्बनच्या उत्सर्जनामुळे झाली आहे.
दिल्लीस्थित ‘क्लायमेट ट्रेंड्स’ या संशोधन संस्थेने नासाच्या उपग्रह डेटाचा वापर करून 2000 ते 2023 दरम्यान हिमालयीन ग्लेशियरवर काळ्या कार्बनचा प्रभाव तपासला. या अभ्यासाचा निष्कर्ष ‘इम्पॅक्ट ऑफ ब्लॅक कार्बन ऑन हिमालयन ग्लेशीयर 23 ईयर ट्रेंड अनॅलिसीस’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या संशोधनानुसार 2000 ते 2019 दरम्यान काळ्या कार्बनच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली, तर 2019 ते 2023 दरम्यान त्यात स्थिरता दिसून आली आहे. हिमालयातील बर्फाच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 2000-09 दरम्यान उणे -11.27 अंश होते, जे 2020-23 दरम्यान -7.13 अंशावर आले आहे. त्यामुळेच बर्फ वितळण्याची प्रक्रिया वेगवान होत आहे.
संशोधनानुसार,ब्लॅक कार्बनचे कण बर्फाचा पृष्ठभाग काळा करतात, त्यामुळे त्याची परावर्तकता कमी होते व जास्त सूर्यप्रकाश शोषला जातो, परिणामी बर्फ लवकर वितळतो.
या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. पलक बल्याण यांनी सांगितले की, हिमालयातील बर्फ वितळत असून, त्याचा परिणाम दोन अब्ज लोकांच्या पाण्याच्या स्रोतांवर होणार आहे. पूर्व हिमालयात ब्लॅक कार्बनचे प्रमाण सर्वाधिक असून, हे क्षेत्र लोकवस्ती व बायोमास जळवणार्या भागांच्या जवळ असल्यामुळे अधिक प्रभावित आहे.
क्लायमेट ट्रेंड्सच्या संचालिका आरती खोसला यांनी सांगितले की, स्वयंपाकाच्या शेगड्या, पीक जाळणे आणि वाहतूक यांसारख्या स्त्रोतांमधून काळ्या कार्बनचे उत्सर्जन कमी केल्यास, हवामान बदलावर झपाट्याने परिणाम करता येऊ शकतो.