राष्ट्रीय

संघाच्या तीव्र नाराजीनंतरही भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातून ‘इनकमिंग’ सुरूच

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजप पक्ष संघटनेत इतर पक्षातून सामील झालेल्या नेत्यांना जास्त महत्व दिले जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली नाराजी दर्शवली आहे. यानंतर ही भाजपने विविध राज्यांमध्ये सत्तेवर येण्यासाठी "आॉपरेशन लोटस" सुरूच ठेवले आहे. हरियाणामध्ये काँग्रेसच्या आमदार किरण चौधरी यांनी आपल्या माजी खासदार मुलीसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने हेच संकेत मिळाले आहेत.

या वर्षाच्या शेवटी महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपने या राज्यांमध्ये सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांसाठी गालिछा अंथरून ठेवला आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर नेत्यांनी दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांना जास्त महत्व दिले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून भाजपने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देणे सुरूच ठेवले आहे.

दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्याच्या भाजपच्या धोरणामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून निवडणुकीत त्यांना संधी मिळत नसल्याची तक्रार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला याच गोष्टीचा मोठा फटका बसला आहे. भाजपने त्यावर विचारमंथनही केले आहे. मात्र, तरीही दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या इनकमिंगवर ब्रेक लागल्याचे बघायला मिळाले नाही.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT