पुढारी ऑनलाईन डेस्क : 27 वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेवर भाजपने कब्जा केला. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा झालेला पराभव आणि भाजपचा ऐतिहासिक विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. या विजयाने दिल्लीच्या ग्रामीण भागातील आम आदमी पक्षाच्या वर्चस्वाला तडा गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
खरं तर, दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी 18 जागा या ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जातात. या 18 पैकी 13 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे, तर आम आदमी पक्षाला फक्त 5 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. ज्या 13 जागा भाजपने जिंकल्या त्यापैकी 6 जागांवर भाजपची मतदान टक्केवारी 50 हून अधिक आहे. यावरूनच भाजपच्या ग्रामीण भागातील लाटेची कल्पना करता येऊ शकते.
अहवालानुसार, शहरी भागातही भाजपचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. शहरी भागातील 52 विधानसभा जागांपैकी 35 जागांवर भाजपने विजय मिळवला, तर आम आदमी पक्षाला फक्त 17 जागा मिळाल्या.
मतदान टक्केवारीच्या दृष्टीने पाहिल्यास, 2015 मध्ये आम आदमी पक्षाला ग्रामीण भागात सुमारे 56 तर भाजपला केवळ 32 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर 2020 मध्येही आपने सत्ता कायम राखली, पण त्यांच्या मतांची टक्केवारी घटली. त्यांन 53 टक्के मते मिळाली. दुसरीकडे भाजपची मतांची टक्केवारी वाढली. कमळाला 38 टक्के मतदारांनी स्विकारले.
यंदाच्या निवडणुकीत बिजवासन आणि मादीपूर या दोन मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष होते. बिजवासन हा मतदारसंघ कैलाश गहलोत यांच्या कारणामुळे चर्चेत होता, कारण ते आम आदमी पक्ष सोडून महिनाभरापूर्वी भाजपमध्ये सामील झाले होते. अखेर, त्यांनी विजय मिळवला.
मात्र, मादीपूर मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या राखी बिर्ला यांना पराभवाचा सामना करावा लागला. राखी पूर्वी मंगोलपुरी मतदारसंघातून आमदार होत्या, पण यावेळी त्यांनी मादीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली.
भाजपने 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवत 27 वर्षांचा वनवास संपवला आणि सत्तेत पुनरागमन केले आहे. आम आदमी पक्ष फक्त 22 जागांवरच राहिला. तर काँग्रेसचे खाते सलग तिसऱ्यांदा शून्यच राहिले.