हाजीपूर : जर बिहारमध्ये एनडीए पुन्हा सत्तेत आली, तर भाजप नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवणार नाही, उलट हे पद आपल्या पक्षाच्या कोणत्यातरी चेल्याला देईल, असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
वैशाली जिल्ह्यातील मुख्यालय हाजीपूरपासून सुमारे 40 कि.मी. अंतरावर असलेल्या राजा पाकर येथे आपल्या पहिल्या बिहार निवडणूक सभेला संबोधित करताना, खर्गे यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. नितीश यांनी जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया आणि कर्पुरी ठाकूर यांसारख्या समाजवादी नेत्यांच्या वारशाचा विश्वासघात केला आहे आणि महिला-विरोधी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. भाजप मनुस्मृती मानणारा पक्ष असल्याचेही ते म्हणाले. ‘नितीश कुमार हे मनुस्मृती मानणार्या भाजपच्या मांडीवर बसले आहेत. त्यांनी जेपी, लोहिया आणि ठाकूर यांच्या विचारांना सोडले आहे. ते दलित, ओबीसी आणि ईबीसींच्या हिताचे रक्षण करू शकत नाहीत,’ असा दावा त्यांनी केला. ‘पण नितीश कुमार यांना हे माहीत नाही की, निवडणुकीनंतर भाजप त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणार नाही; उलट हे पद आपल्या कोणत्यातरी चेल्याला (कार्यकर्त्याला) देईल,’ असे खर्गे म्हणाले.
‘पंतप्रधानांना जगभर फिरण्यासाठी वेळ आहे; पण देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाही. ते फक्त निवडणुकीच्या वेळीच दिसतात. अगदी महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मोदी शहराच्या रस्त्यांवर फिरताना दिसतात. बिहार विधानसभा निवडणुकीतही ते इतके व्यस्त आहेत, जणू काही त्यांच्या मुलाचेच लग्न आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला. नितीश कुमार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘नितीश यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नऊ वेळा शपथ घेतली आणि 20 वर्षे राज्य केले, तरीही ते नोकर्या देऊ शकले नाहीत किंवा तरुणांचे स्थलांतर थांबवू शकले नाहीत.’