नवी दिल्ली: अजित पवार यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणावरुन क्लीनचीट मिळाली आहे. त्यावरुन काँग्रेसने शनिवारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपची वॉशिंग मशीन अखंड चालू आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार बनवण्याच्या बदल्यात या मशीनने अजित पवारांची धुलाई करून त्यांना चमकवले आहे, अशी टीका काँग्रेसने केली.
काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन भाजपवर जोरदार शेरेबाजी केली आहे. आयकर विभागाने २०२१ मध्ये अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांची १ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. भाजपच्या वॉशिंग मशिनच्या जादूमुळे आता या मालमत्ता आयकर विभागाने सोडल्या आहेत, असा आरोप रमेश यांनी केला. ज्यावेळी अजित पवारांवर कारवाई झाली, त्यावेळी ते विरोधी पक्षात होते. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी अजित पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वाभाविकच भ्रष्ट पक्ष असल्याचे म्हटले होते, असे रमेश म्हणाले.
यापूर्वी जेव्हा अजित पवार भाजपसोबत आले त्याचवेळी ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा, जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळा आणि इतर अनेक प्रकरणांची चौकशी थांबवण्यात आली होती, असा आरोपही काँग्रेसने केला.
हिमंता बिस्वा शर्मा, नारायण राणे, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल, सुवेंदू अधिकारी, नवीन जिंदाल, मुकुल रॉय, मिथुन चक्रवर्ती, सोवन चॅटर्जी, वायएस चौधरी, जगन रेड्डी, जितेंद्र तिवारी, हार्दिक पटेल अशी शेकडो नावे आहेत जी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतर निष्कलंक झाली आहेत, असे रमेश म्हणाले.