नवी दिल्ली : संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी, भाजप मुख्यालयात आढावा बैठक झाली. यामध्ये राज्यनिहाय सदस्यत्व अभियान राबण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच मंडल, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीची रूपरेषा ठरवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी पक्षाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, सर्व प्रदेशाध्यक्ष, प्रदेश संघटन सरचिटणीस उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सर्व राज्य घटकांनी सक्रिय सदस्यांची यादी तयार केली आहे. भाजपला नवा अध्यक्ष मिळण्यासाठी महिन्याहून अधिक कालावधी लागणार आहे. कारण पक्षाच्या घटनेनुसार, सदस्यत्व मोहीम संपल्यानंतर राज्यांमध्ये संघटनेच्या निवडणुका घेतल्या जातात. अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये संघटनेच्या निवडणुकांनंतरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाते. अशा स्थितीत संघटना निवडणुका घेण्यासाठी भाजप सध्या वेगाने काम करत आहे. राज्य संघटनेच्या निवडणुका निर्धारित वेळेत पार पाडण्याचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. जानेवारीत भाजप आपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणार आहे. आजच्या बैठकीत पक्षाने सर्व घटकांच्या अध्यक्षांना आपापल्या राज्यातील भाजप सदस्यांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले.
आजच्या बैठकीत शनिवारी होणाऱ्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवरही चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या राज्यांशी संबंधित संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच निवडणुकीचा पूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी अतिउत्साही न होण्याच्या सूचना देण्याचा संदेशही देण्यात आला आहे. भाजपला दोन्ही राज्यात सरकार स्थापनेची पूर्ण आशा आहे. आजच्या बैठकीत आगामी निवडणूक राज्य दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकीवरही चर्चा झाली. नेते आणि कार्यकर्त्यांना आतापासूनच तयारीला लागण्यास सांगण्यात आले आहे.
भाजपच्या बिहार कोअर कमिटीची आज दिल्लीत आढावा बैठक झाली. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. संघटनेच्या व राज्याच्या आगामी कार्यक्रमांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्र्यांनी या बैठकीची माहिती एक्सवर पोस्ट करुन दिली. या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील योजना व कार्य याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला गिरीराज सिंह यांच्याशिवाय भाजपचे बिहार प्रदेश प्रभारी विनोद तावडे, सहप्रभारी दीपक प्रकाश, प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, उपमुख्यमंत्री विजय सिन्हा, बिहार सरकारचे मंत्री मंगल पांडे आदी उपस्थित होते.