मृणालिनी नानिवडेकर
मुंबई : भारतीय जनता पक्ष सातत्याने विजय मिळवत असतो हे आता भारतीयांच्या सवयीचे झाले आहे. मात्र, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, ओडिशा, तामिळनाडू आणि दिल्ली अशा राज्यांमध्ये भाजपला यश मिळत नव्हते. केवळ गंगा जमुना प्रदेशातला आणि गुजरातेतला पक्ष अशी पक्षाची प्रतिमा पश्चिम बंगालमधील बहुप्रतीक्षित विजयानंतर आता इतिहासजमा होणार आहे.
भारतातल्या 78 टक्के भूभागावर आता भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रस्थापित झाले आहे 2025 साली पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदी यांनी तिसर्यांदा शपथ घेतली खरी मात्र ते यश मर्यादित होते. स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने भारतीय जनता पक्षात काहीशी अस्वस्थता होती. ती अस्वस्थता पूर्णत: झाकून ठेवत त्यानंतर येणार्या प्रत्येक निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकण्याचा प्रयत्न केला अन् तो यशस्वी केला. महाराष्ट्र, बिहार आणि दिल्ली या पाठोपाठ आता पश्चिम बंगालची अत्यंत कठीण वाटणारी निवडणूक भारतीय जनता पक्षाने जिंकली आहे. ओडिशा, दिल्ली ही राज्ये भारतीय जनता पक्षांनी गेल्या काही महिन्यात जिंकली होती. पटनाईक, केजरीवाल, ठाकरे हे प्रादेशिक नेते हरले होते. मात्र तरीही ममतादीदी होत्याच. पश्चिम बंगालमध्ये तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच लोकप्रिय असल्यामुळे त्यांना हरवणे फारसे सोपे मानले जायचे नाही. पश्चिम बंगालमधील उपराष्ट्रवाद हा देखील भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय धोरणाला हरवतो, तो प्रांत राष्ट्रवादाला सुसंगत नसल्याचे बोलले जायचे. मात्र प्रादेशिक पक्ष परास्त करण्याच्या भाजपच्या धोरणाचा प. बंगालमध्येही या वेळेला विजय झाला असून आता तेथेही भाजपचे राज्य स्थापन होणार आहे.
आसामात तिसर्यांदा कमळ
आसाममध्ये तिसर्यांदा सत्ता मिळवताना पुद्दुचेरी हे तामिळनाडू शेजारचे छोटा असा टापू भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. हा केंद्रशासित प्रदेश प्रारंभी कायम तामिळनाडू प्रमाणे मतदान करायचा. आता मात्र पर्याय मिळाल्याबरोबर तेथील जनता ही वेगळा विचार करू शकते, हे दिसले आहे. तामिळनाडू आणि केरळ हे दक्षिणेतले दोन प्रांत वगळता आता भारतीय जनता पक्ष सर्वत्र विजयी यात्रा करतो आहे, हे सध्या तरी स्पष्ट झालेले आहे. भाजपचा अश्वमेधाचा वारू ममताबाईंना थांबवता आला नाही. 2025 साली लागलेल्या लोकसभा निवडणूक निकाळात पक्षाला जे यश मिळाले होते ते निर्विवाद नव्हते. मित्रपक्षांचा आधार घेऊन जी सत्ता स्थापन करावी लागली त्याबद्दल भारतीय जनता पक्षाने काहीही न बोलता आत्मपरीक्षण केले आणि त्यानंतर स्वतःची काय चूक झाली ते शोधत उपाययोजना केली हे दिसते आहे.