नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी (दि.१७) आपला ‘संकल्प पत्र’ नाव दिलेला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपच्या जाहीरनाम्यात दिल्लीतील ६०-७० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीवेतन २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात येईल. ७० वर्षांवरील व्यक्ती, विधवा आणि दिव्यांगांना ३,००० रुपये मिळतील. होळी- दिवाळी या सणांना प्रत्येक गरीब कुटूंबातील महिलेला एक सिलेंडर मोफत दिले जाईल. घरगुती सिलेंडर ५०० रुपयांमध्ये दिले जाईल. तसेच दिल्ली सरकारकडून लोकांना ५ लाख रुपयांचा आणि केंद्र सरकारकडून ५ लाख असा १० लाख रुपयांचा विमा दिला जाईल. पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्यमान भारत योजना लागू करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांना दहा लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील, अशा महत्वपुर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. महिलांसाठीही महत्वपूर्ण घोषणा यामध्ये करण्यात आल्या आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी आमचे सरकार आल्यावर आम्ही सध्याच्या दिल्ली सरकारच्या योजना चालूच ठेवू मात्र त्यातून भ्रष्टाचार काढून टाकू, असे म्हणत नड्डा यांनी टोला नाव न घेता विरोधकांना लगावला. दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारीला सर्व ७० जागांवर मतदान होणार आहे.
महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना २५०० रुपये दिले जातील
होळी, दिवाळी या सणांना प्रत्येकी एक सिलेंडर मोफत दिले जाईल
घरगुती सिलेंडरवर ५०० रुपये पर्यंत अनुदान दिले जाईल
गर्भवती महिलांना २१ हजार रुपये दिले जातील
गर्भवती महिलांना न्यूट्रिशनल पॅकेट (पौष्टिक आहार सुविधा) दिले जातील
जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बोलताना नड्डा म्हणाले की, आप सरकारने दिल्लीतील वृद्ध लोकांचा विश्वासघात केला. कोरोना काळात दिल्लीत ८० हजार वृद्धांचा मृत्यू झाला तेव्हा आप सरकारने निवृत्तीवेतन यादीत त्यांच्या जागी नवीन नावे जोडली नाहीत. आप सरकार गरिबांना त्रास देते. कोरोना काळात पूर्वांचलमधील लोकांनाही आप सरकारकडून त्रास सहन करावा लागला. त्यांना अमानुष वागणूक देण्यात आली. कोरोना काळात त्यांना आनंद विहार स्टेशनवर पाठवून त्यांना त्रास दिला गेला. कोरोना काळात अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेची दिशाभूल केली. ऑक्सिजनबद्दल ते खोटे बोलले.
दिल्लीत आप आणि काँग्रेसप्रमाणेच भाजपनेही महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केले. जास्तीत जास्त महिला मतदारांना सुविधा देण्याचा प्रयत्न संकल्प पत्राच्या माध्यमातून केला आहे. तिन्ही पक्षांनी एकाच वर्गावर लक्ष केंद्रित केल्यानंतर महिला मतदार कुणाच्या बाजूने मन वळवणार त्यावर दिल्ली कुणाच्या हातात असणार, हे ठरणार आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनीही शुक्रवारी सकाळी एक मोठी घोषणा केली. निवडणूक जिंकल्यानंतर आप सरकार विद्यार्थ्यांसाठी बस सेवा मोफत देईल. त्याचप्रमाणे दिल्ली मेट्रोमध्येही विद्यार्थ्यांना ५०% सूट मिळेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, केजरीवाल यांनी शुक्रवारी सकाळी मोदींना एक पत्र लिहीत तसे संकेत दिले होते.