नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी 6 राज्यांतून 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रातून उमेदवार कोण असतील, याबाबत अजूनही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यात उत्सुकता कायम आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 5 मार्च आहे. यासाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणीदेखील होईल.
नितीन नवीन यांची 20 जानेवारी रोजी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सध्या नितीन नवीन बिहार विधानसभेचे सदस्य आहेत आणि त्यांच्याकडे बिहार सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारीदेखील आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते राज्यसभेवर येतील, अशा चर्चा होत्या. त्याप्रमाणे भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली. संख्याबळ पाहता त्यांची निवड निश्चित आहे. त्यामुळे राज्यसभेवर आल्यानंतर बिहार विधानसभा सदस्यपदाचा आणि मंत्रिपदाचा ते राजीनामा देण्याची शक्यता आहे.
मंगळवारी भाजपने 6 राज्यांमधून राज्यसभेच्या 9 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बिहारमधून राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, माजी आमदार शिवेश कुमार, हरियाणामधून माजी खासदार संजय भाटिया, छत्तीसगडमधून भाजप प्रदेश उपाध्यक्षा लक्ष्मी वर्मा, पश्चिम बंगालमधून माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा, आसाममधून राज्य सरकारमधील मंत्री जोगेन मोहन, माजी आमदार तेराश गोवाला, ओडिशामधून प्रदेशाध्यक्ष मनमोहन शामल आणि खासदार सुजित कुमार यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत. यामध्ये भाजपचे 4, शिवसेना शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून जाऊ शकतात. तर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. यापैकी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून पार्थ पवार यांची उमेदवारी पूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. विविध पक्षांच्या 6 लोकांची नावे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. या जागांवर विविध नावांची चर्चा होत आहे.