१८ व्या लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून भर्तृहरी महताब यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली.  ANI
राष्ट्रीय

महताब यांनी घेतली लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ

१८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु

पुढारी वृत्तसेवा

ओडिशातील कटक लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी महताब यांनी सोमवारी (दि.२४) १८ व्या लोकसभेचे प्रभारी लोकसभा अध्यक्ष (प्रोटेम स्पीकर) म्हणून शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. त्यानंतर महताब यांनी आजपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले.

१८ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रापूर्वी (Parliament Session 2024) विरोधकांच्या तीव्र आक्षेपानंतरही भाजप खासदार भर्तृहरी महताब यांनी सोमवारी लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. महताब यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता संसद भवनात लोकसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. सर्वप्रथम लोकसभेचे सदस्य म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथ घेतली. त्यानंतर इतर सदस्यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.

महताब यांच्या निवडीवर विरोधकांकडून टीका झाली. विशेषत: काँग्रेसने त्यावर जोरदार आक्षेप घेतला. लोकसभेत आठवेळा खासदार म्हणून राहिलेले कोडीकुन्नील सुरेश यांची प्रभारी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्याची मागणी काँग्रेसने केली होती.

१८ व्या लोकसभेचे अधिवेशन आज सोमवारपासून सुरू झाले. या अधिवेशनात एनडीए सरकारची कसोटी लागण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याची तयारी केली आहे. याशिवाय अनेक विषयांवर विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांत खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कोण आहेत भर्तृहरी महताब?

भर्तृहरी महताब हे ओडिशातील कटक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ओडिशाच्या राजकारणातील ते प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. महताब यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्चमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते बिजू जनता दलामध्ये होते. २०१७ मध्ये त्यांना लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT