BJP Protest | ‘मोदी का बाप भी जायेगा’ या खर्गेंच्या विधानावरून भाजपचा ‘जनआक्रोश’ 
राष्ट्रीय

BJP Protest | ‘मोदी का बाप भी जायेगा’ या खर्गेंच्या विधानावरून भाजपचा ‘जनआक्रोश’

महाराष्ट्रासह दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशात जोरदार निदर्शने

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पाटणा येथील एका कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘मोदी का बाप भी जायेगा,’ असे उद्‌गार काढल्यानंतर भारतीय जनता पक्षाने देशभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या विधानाचा निषेध करत भाजपने महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये जोरदार निदर्शने केली. तसेच, खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी देशाची माफी मागावी, अशी मागणी लावून धरली आहे.

या विधानाच्या निषेधार्थ सोमवारी भाजपने देशभरात आंदोलने केली. राजधानी दिल्लीत राजाजी मार्गावरील खर्गे यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. पाटण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुख्यालयापासून इन्कमटॅक्स गोलंबरपर्यंत ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला व खर्गेे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. सरावगी यांनी म्हटले की, काँग्रेसने राजकीय वैफल्यातून मर्यादा ओलांडून वैयक्तिक चिखलफेक सुरू केली आहे.

पाटण्यातील कोतवाली पोलिस ठाण्यात खर्गे यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. जयपूर, बंगळूर, लखनौ, जम्मू आणि उत्तराखंडच्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाजप युवा मोर्चा व महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत खर्गेेंच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी खर्गेेंच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षांकडून अशा प्रकारचे वक्तव्य येणे धक्कादायक आहे. यामुळे कोट्यवधी नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे राजनाथ सिंह म्हणाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी संकुचित राजकीय स्वार्थासाठी पंतप्रधानांच्या दिवंगत पालकांना राजकारणात ओढणे दुर्दैवी असल्याचे नमूद केले.

काँग्रेसचे स्पष्टीकरण

वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने यावर स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख पवन खेडा म्हणाले की, खर्गेे भाषण करत असताना भाजप कार्यकर्त्यांनी आधी त्यांच्या दिवंगत वडिलांविषयी आक्षेपार्ह टिपणी केली. त्याला उत्तर देताना खर्गे यांनी पंतप्रधान मोदींचे ‘वैचारिक पिता’ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला होता. भाजपकडून सातत्याने ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केला जात असल्याचा प्रत्यारोपही काँग्रेसने केला आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे...

बिहारचे पहिले मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिंह यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त पाटण्यात रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणीतील कथित गैरव्यवहारावर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, यात सामील असलेल्यांना काँग्रेस तुरुंगात पाठवेल. त्याच वेळी उपस्थितांमधून एका व्यक्तीने ‘मोदी कुठेही जाणार नाहीत,’ असा नारा दिला. यावर संतप्त झालेल्या खर्गेे यांनी, ‘मोदी का बाप भी जायेगा, बाप भी जायेगा,’ असा प्रतिवाद केला. या विधानाचा व्हिडीओ समोर येताच भाजपने खर्गे यांच्यावर पंतप्रधानांच्या दिवंगत वडिलांचा अपमान केल्याचा आरोप केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT