kiren rijiju File Photo Pudhri News
राष्ट्रीय

हंगामी लोकसभा अध्यक्ष नियुक्तीच्या वादावर भाजपचा काँग्रेसवर पलटवार

किरेन रिजिजू यांनी काँग्रेसच्या टिकेला दिले सडेतोड प्रत्युत्तर

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हंगामी लोकसभा अध्यक्षांच्या नियुक्तीवरून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेसवर केंद्रीय सांसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी पलटवार केला आहे. रिजीजू यांनी पत्रकारपरिषद घेऊन काँग्रेसला ब्रिटीश संसदेच्या नियमांची आठवण करून दिली. 2004 मध्ये काँग्रेसचे सरकार असताना ज्येष्ठता डावलून अटलबिहारी वाजपेयी यांच्या जागेवर सोमनाथ चॅटर्जी यांची निवड केल्याचे सांगून रिजीजू यांना काँग्रेसवर हल्ला चढविला.

मागील लोकसभेच्या कार्यकाळात सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नेते वीरेंद्र कुमार यांना हंगामी लोकसभा अध्यक्षपद देण्यात आले होते. आता या पदावर निवड झालेले भतृहरी मेहताब हे सुद्धा ज्येष्ठ असून ते लोकसभेवर ७ वेळा निवडणून आले असल्याचे रिजीजू यांनी स्पष्ट केले.

सुरेश यांची हंगामी लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली नसल्याबद्दल काँग्रेस ज्या नियमांचा आधार घेत आहे, तो नियम ब्रिटीश संसदेत लागू होतो. खासदार सुरेश हे आठवेळा लोकसभेवर निवडून आले असले तरीही ते सलग निवडून आलेले नाहीत. त्यांच्या खासदारकीमध्ये मध्ये खंड पडला होता. त्यामुळे ब्रिटीश नियमांचा आधार घेऊनच त्यांना हंगामी लोकसभा अध्यक्षपद नाकारण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

गेल्या लोकसभेत वीरेंद्रकुमार यांना हंगामी अध्यक्षपद देण्यात आले, त्यावेळी मनेका गांधी यांना अध्यक्षपद देण्याची मागणी पुढे आली होती. मात्र, मनेका गांधी सुध्दा सलग निवडून आल्या नसल्याने त्यांना हे पद देण्यात आले नव्हते, असे स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिले. काँग्रेसने 2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना हंगामी लोकसभा अध्यक्षपद नाकारून सोमनाथ चॅटर्जी यांना दिले होते. काँग्रेसनेच संसदेची परंपरा मोडीत काढल्याचा आरोप रिजीजू यांनी केला.

लोकसभा अध्यक्षपद एनडीएच्या सहमतीने ठरविणार

अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवड करताना विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन सर्व सहमतीने नाव निश्चित केले जाणार असल्याची माहिती किरेन रिजीजू यांनी दिली. या पदावर कोणाची नियुक्ती केली जाईल, याबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. लोकसभा अध्यक्ष सर्वसहमतीने निवडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा उपाध्यक्ष पदाविषयी सध्या काहीही विचार सुरू नसल्याचे रिजीजू यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT