नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला २०२३-२४ या आर्थिक वर्षात व्यक्ती, ट्रस्ट आणि कॉर्पोरेट संस्थांकडून सुमारे २ हजार २४४ कोटी रुपयांची राजकीय देणगी मिळाली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात भाजपला ७४२ कोटी रुपये राजकीय देणगी मिळाली होती. त्यामध्ये तिपटीने वाढ झाली आहे. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात काँग्रेसला केवळ २८८.९ कोटी रुपये राजकीय निधी मिळाला आहे. जो मागील आर्थिक वर्षात ७९.९ कोटी रुपये होता. हा राजकीय निधी २० हजार किंवा त्यापेक्षा जास्तीच्या देणगीदारांनी दिलेली रक्कम आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने जारी केलेल्या राजकीय निधीच्या अहवालात समोर आली आहे.
अहवालानुसार, भाजपला प्रुडंट निवडणूक ट्रस्टकडून ७२३.६ कोटी रुपये, तर या ट्रस्टने काँग्रेसला १५६.४ कोटी रुपये निधी दिला आहे. प्रुडंटचे योगदान हे भाजपच्या निधीपैकी जवळपास एक तृतीयांश आणि काँग्रेसच्या वर्षभरातील एकूण निधीपैकी निम्म्यापेक्षा जास्त आहे. २०२२-२३ मध्ये, प्रुडंटच्या प्रमुख देणगीदारांमध्ये मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, आर्सेलर मित्तल ग्रुप आणि भारती एअरटेल यांचा समावेश होता.
घोषित देणग्यांमध्ये निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेला निधी वगळला जातो. उल्लेखनीय म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक रोखे योजना अवैध ठरवली. परिणामी, थेट निधी आणि निवडणूक ट्रस्टद्वारे पाठवलेला निधी हे राजकीय पक्षांसाठी वित्तपुरवठा करण्याचे प्राथमिक स्त्रोत म्हणून उदयास आले आहेत.
प्रादेशिक पक्षांमध्ये भारत राष्ट्र समितीला ४९५.५ कोटी रुपये, वाएसआर काँग्रेसला १२१.५ कोटी रुपये आणि द्रमुकला ६० कोटी रुपये मिळाले. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ने ११.५ कोटी रुपयांची रोखे पावती जाहीर केली आणि इतर देणग्यांमध्ये एकूण ६४ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी जेएमएमला मिळाला असल्याचे निवडणूक आयोगाच्या अहवालात नमूद केले आहे. समाजवादी पक्षाला ४६.७ लाख रुपये निधी मिळाला आहे. मागच्या वर्षी ही रक्कम ३३ कोटी होती.
निवडणूक ट्रस्टद्वारे, भाजपला ८५० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामध्ये प्रुडंटकडून ७२३ कोटी रुपये, ट्रायम्फ निवडणूक ट्रस्टकडून १२७ कोटी रुपये आणि इनझिगार्टीग निवडणूक ट्रस्टकडून १७.२ लाख रुपये समाविष्ट आहेत. प्रुडंटने २०२३-२४ मध्ये बीआरएसला ८५ कोटी रुपये आणि वायएसआर काँग्रेसला ६२.५ कोटी रुपयांची देणगी देखील दिली. आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलुगु देसम पक्षाने (टीडीपी) प्रुडंटकडून ३३ कोटी रुपये मिळवले, तर द्रमुकला ट्रायम्फ निवडणूक ट्रस्ट आणि जयभारत ट्रस्टकडून ८ कोटी रुपये मिळाले.
इतर राष्ट्रीय पक्षांपैकी आम आदमी पक्षाला २०२३-२४ मध्ये ११.१ कोटी, माकपला ७.६ कोटी, मेघालयातील नॅशनल पीपल्स पक्षाला (एनपीपी) १४.८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.