नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केलेल्या टिप्पणीमुळे मोठे वादळ उठले. ‘काँग्रेसच्या राजघराण्याने राष्ट्रपतींचा अपमान केला,’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोनिया गांधींच्या वक्तव्यावर टीका केली. भाजपनेही सोनिया गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांचे विधान सरंजामी विचारसरणीचे आणि आदीवासी समुदायातून येणाऱ्या राष्ट्रपतींबद्दलच्या त्यांच्या निराशेचे प्रतिबिंब आहे. राष्ट्रपतींविरुद्धच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली.
सोनिया गांधींच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी जोरदार टीका केली. दिल्लीतील द्वारका येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, "आज देशाने पुन्हा एकदा काँग्रेसच्या राजघराण्याचा अहंकार पाहिला आहे. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत भाषण केले. त्यांनी देशवासीयांच्या कामगिरीबद्दल सांगितले. विकसित भारताच्या दृष्टिकोनाबद्दल त्या बोलले. हिंदी ही त्यांची मातृभाषा नाही, तरीही त्यांनी खूप चांगले भाषण दिले. मात्र काँग्रेसच्या राजघराण्याने त्यांचा अपमान करायला सुरुवात केली आहे,” असेही ते म्हणाले.
संसदेच्या अर्थसंकल्पयीय अधिवेशनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिभाषण केले. या अभिभाषणावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणानंतर संसद परिसरात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आपसात बोलत होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोनिया गांधींना प्रश्न विचारले. सोनिया गांधींना प्रश्न विचारताच राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या भाषणाला कंटाळवाणे म्हटले. ते म्हणाले की राष्ट्रपती जुन्याच गोष्टी पुन्हा सांगत आहेत. यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘’शेवटी राष्ट्रपती खूप थकल्यासारख्या होत होत्या. त्यांना बोलूही शकत नव्हत्या, बिचाऱ्या... (पुअर लेडी)’’
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी सोनिया गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केलेली विधाने अत्यंत निषेधार्ह आहेत. हे विधान काँग्रेसच्या सरंजामी विचारसरणीचे, त्यांच्या अहंकाराचे आणि आदीवासी समुदायातून येणाऱ्या राष्ट्रपतींबद्दलच्या त्यांच्या निराशेचे प्रतिबिंब आहे. काँग्रेसची विचारसरणी नेहमीच एससी-एसटी-ओबीसी विरोधी राहिली आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा तीच विचारसरणी दाखवली आहे. दलित, वंचित आणि मागासलेल्या समाजातील लोक देशातील सर्वोच्च पदांवर विराजमान होत आहेत, हे काँग्रेस नेत्यांना सहन होत नाही. काँग्रेसने केवळ आदिवासी समुदायाचाच अपमान केला नाही तर देशातील सर्वोच्च संवैधानिक पदाचाही अपमान केला आहे, एका महिलेचा अपमान केला आहे, ओडिशाचा अपमान केला आहे. राष्ट्रपतींविरुद्धच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाने माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले.
भाजपा नेते संबित पात्रा यांनीही सोनिया गांधी यांच्या वक्तव्यावर टीका केली. 'आज संपूर्ण देशाने राष्ट्रपतींचे भाषण लक्षपूर्वक ऐकले. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींबद्दल केलेले वक्तव्य अतिशय दुखद आहे. राष्ट्रपती अभिभाषणाच्या दरम्यान थकल्या होत्या, असे त्या म्हणाल्या. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. या देशात राष्ट्रपती सशक्त आहेत,' असेही ते म्हणाले.