नवी दिल्ली : भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने लष्कराचा अपमान होत आहे. हे अत्यंत लाजिरवाणे आणि दु:खद आहे. मात्र, भाजप या नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, असे म्हणत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. त्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनीही भारतीय सैन्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधींनी थेट भाजपवर हल्ला चढवला.
प्रियांका गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने आपल्या लष्कराचा अपमान होत आहे. संपूर्ण देश आपल्या लष्कराच्या शौर्यावर अभिमान बाळगतो; मात्र भाजप या शूर जवानांचा अपमान करत आहे. भाजप आपल्या नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. भाजप हे करून देशवासीयांना आणि आपल्या लष्कराला काय संदेश देऊ इच्छित आहे? असा प्रश्नही प्रियांका गांधी यांनी विचारला.