पाटणा; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल दरभंगा येथील सभेत वापरलेल्या अपशब्दांच्या निषेधार्थ भाजपने काढलेल्या मोर्चादरम्यान शुक्रवारी पाटण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार संघर्ष झाला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाकडे मोर्चा वळवताच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. वृत्तसंस्था एएनआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना पक्षाच्या झेंड्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. कायदा व सुव्यवस्था डीएसपी कृष्ण मुरारी प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी दोन्ही गटांत दगडफेकही झाली. ते म्हणाले, या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास गुन्हा दाखल करून तपास केला जाईल. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरभंगा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दरभंगा येथील भोपुरा गावचा रहिवासी असलेल्या रिझवी ऊर्फ राजा याला गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘मतदार अधिकार यात्रे’दरम्यान बिठौली चौकात आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली होती.