भाजपला विजयाचा विश्वास  File Photo
राष्ट्रीय

भाजपला विजयाचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

प्रथमेश तेलंग,

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ही निवडणूक जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पक्ष संघटना, केंद्र सरकार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) या सर्व ठिकाणी ताकद मजबूत करायची आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघापुढेही स्वतःची ताकद वाढवायची आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे भविष्य ठरवणारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रामध्ये विजयाचा विश्वास वाटत आहे. त्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप आणि सरकारविरोधात तयार झालेली जनभावना अलीकडच्या काळात राज्य सरकारने कामांच्या माध्यमातून कमी केल्याचा विश्वास पक्षाला वाटत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची लोकप्रियता कमी झाल्याचा चर्चाना सुरुवात झाली. त्याचे मुख्य कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पक्षाला यश मिळाले नाही. परिणामी, भाजपला एनडीएमधील घटकपक्षांवर जास्त अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. धडाधड निर्णय घेणारे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांना मित्रपक्षांचे ऐकण्याची वेळ आली. निवडणुकीत खास कामगिरी केली नाही, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघही जास्त सक्रिय झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी या दोन्ही नेत्यांच्या मर्जीतील व्यक्ती सोडून तिसऱ्याच कोणाला तरी संघ बसवेल, असे बोलले जाऊ लागले. त्यामध्ये अगदी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, भाजप आणि संघाचे जुने नेते संजय जोशी यांसारख्या नावाची चर्चा झाली. हरियाणा विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. या आत्मविश्वासाला कायम ठेवायचे असेल, संघापुढे आपली वट वाढवायची असेल, केंद्रातील सत्तेची खुर्ची मजबूत ठेवायची असेल तर महाराष्ट्रातील निवडणूक जिंकणे गरजेचे आहे.

नाराजी दूर करण्यावर विशेष लक्ष

राज्यातील लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर भाजप आता महाराष्ट्रात विशेष लक्ष देत आहे. महाराष्ट्राशी संबंधित केंद्रीय मंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांची सरकारबद्दलची नाराजी प्रामुख्याने कांदा, कापूस आणि सोयाबीनबाबत होती. केंद्र सरकारने या समस्येवर तोडगा काढून शेतकऱ्यांची नाराजी दूर केली आहे. मध्यमवर्गीय जनतेची नाराजी दूर करण्याचे काम महायुती सरकारने केल्याचेही ते म्हणाले.

  • मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम होऊ नये यासाठी भाजप मराठवाड्यात खूप जास्त प्रयत्न करत आहे. भाजप लहान, बिगर मराठा समाजापर्यंतही पोहोचत आहे.

  • लोकसभेत भाजपपासून दूर जात असलेल्या दलित मतांवर जास्त लक्ष केंद्रित केले असल्याचे समजते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे दलित लोकसंख्येच्या ६० टक्के असलेल्या बौद्ध दलित या मतांवर काम करत असताना, पक्षाला आशा आहे की दलित मते भाजपकडे परत येतील.

  • धनगर, माळी, कुणबी, वंजारी आणि इतर किमान ५० ओबीसी जातींवर भाजपचे लक्ष्य आहे. याबरोबरच महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि महायुतीच्या प्रचारासाठी जास्त सक्रिय झाला आहे.

  • भाजपनेही प्रत्यक्ष मतदारसंघामध्ये अगदी बारीकनियोजन करायला सुरुवात केली आहे. स्वतः अमित शहा प्रत्येक मुद्द्यांकडे लक्ष देऊन आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक हालचालीवर त्यांचे लक्ष आहे, त्यामुळे भाजपला विजयाचा विश्वास आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT