नवी दिल्ली : रोहिग्यांना दिल्लीत स्थायिक करण्याच्या मुद्द्यावरुन भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. सोमवारी, अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर आरोप केला, ते म्हणाले की, भाजपचे हरदीप सिंग पुरी आणि अमित शाह यांच्याकडे रोहिंग्यांना स्थायिक केल्याची सर्व माहिती आहे. त्यानंतर भाजपने प्रत्यारोप केला. आम आदमी पक्षाच्या आमदाराने रोहिग्यांना दिल्लीत स्थायिक होण्यास मदत केल्याचे भाजपने म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते हरदीप सिंग पुरी म्हणाले की, केजरीवाल यांच्या आमदाराने रोहिंग्यांना दिल्लीत स्थायिक होण्यास मदत केली आणि त्यांना मोफत रेशन, पाणी, वीज आणि मतदार कार्ड दिले. ‘एक्स’वर पोस्ट करुन त्यांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले की, खोट्याची पुनरावृत्ती केल्याने ते खरे होत नाही. कोणत्याही रोहिंग्या निर्वासिताला ईडब्ल्यूएस फ्लॅट मिळालेले नाहीत. रोहिंग्या कोणत्या पक्षाचे मतदार आहेत हे सर्वांना माहीत आहे. रोहिंग्यांना वारंवार समर्थन करणे म्हणजे देशाच्या सुरक्षेशी खेळण्यासारखे आहे, असे हरदीपसिंग पुरी म्हणाले.
या अगोदर आज आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर याच मुद्द्यावरुन आरोप केला. ते म्हणाले की, हरदीप सिंग पुरी यांना अटक करण्यात यावी. रोहिंग्यांना कुठे आणि कसे स्थायिक केले याची सर्व माहिती हरदीप सिंग पुरी यांच्याकडे असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. हरदीप सिंग पुरी आणि अमित शहा यांच्याकडे रोहिंग्या संबंधीची सर्व माहिती असल्याचे ते म्हणाले.