पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत स्वतंत्र झाल्याचा जल्लोष एकीकडे आणि दुसरीकडे हिंदु- मुस्लिम दंगलीचे अस्वस्थ वातावरण. ब्रिटिशकालीन भारतात मुज्जफरगढ प्रांतात हिंसाचाराचा आगडाेंब उसळला हाेता. यावेळी झालेल्या हिंसाचारात मिल्खा सिंग यांच्या आईवडिलांसह दाेन भावांची हत्या झाली. यानंतर खर्या अर्थाने त्यांचा संघर्ष सूरु झाला. मिल्खा सिंग यांचे सुखासीन आणि गौरवाने भारलेले आयुष्य आपल्याला दिसते; पण ते साध्य करण्यासाठी त्यांनी कधी काळी दिल्लीत बुट पॉलिश केले तर कधी रबराच्या कारखान्यातही काम केले होते. अखेर सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांना खरी ओळख मिळाली.
वाचा : ब्रेकिंग ! फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन
मिल्खा सिंग हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे एकमेव ॲथलेटिक होते. २०१० मध्ये कृष्णा पुनिया हिने ताे रेकॉर्ड मोडले. १९५८ आणि १९६२ मध्ये एशियन गेममध्येही त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते. त्यांनी देशासाठी खेळात दिलेले योगदान पाहता त्यांना सर्वोच्च पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
रोममध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील अंतिम फेरीत ४०० मीटर प्रकारात त्यांचे कास्यपदक ०१ सेकंदाने हुकले होते. हा क्षण त्यांना आयुष्यभर बोचत राहिला. २०१३ मध्ये 'माय रेस माय लाइफ' (फ्लाइंग सिख मिल्खा सिंह) हे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते. त्यावर आधारित ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला फरहान अख्तर या अभिनेत्याने भूमिका केलेला 'भाग मिल्खा भाग' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
वाचा : मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सिख' नाव का पडलं?; पाकिस्तानला जोडणारी कहाणी
१९३५ मध्ये जन्मलेले मिल्खा सिंग फाळणीच्यावेळी १५-१६ वर्षांचे होते. ब्रिटिशकालीन भारतात मुज्जफरगढ येथील गोविंदपुरा येथे त्यांचा जन्म झाला. फाळणीपूर्वी पाकिस्तानातच त्यांचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले. फाळणीच्यावेळी झालेल्या नरसंहारात त्यांचे आईवडील, दोन भाऊ आणि भावांच्या पत्नींचीही हत्या करण्यात आली होती.या नरसंहाराआधी मिल्खा सिंग हे यांचे मोठे भाऊ माखन सिंग यांच्याकडे मुलतानला रहायला गेले होते. मुलतानला जाताना ते महिलाच्या डब्यात सीटखाली लपून बसले होते. त्यानंतर चार पाच दिवसांनी मिल्खा आपला भाऊ, वहिणीसह सैन्याच्या ट्रकात बसून फिरोजपूरला आले. तेथे ते मिळेल ते काम करू लागले. सैन्याच्या कॅम्पमध्ये फिरून येणे आणि जेवणासाठी बूट पॉलिश करणे हा त्यांचा दिनक्रम होऊन गेला होता.
नोकरीच्या शोधात दिल्लीला
काम मिळत नसल्याने फिरोजपूरमधून ते दिल्लीला आले. तेथे रहायला जागाच नसल्याने कित्येक दिवस रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिवस काढले. त्यानंतर शहादरा येथे वहिणीच्या आईवडिलांकडे ते राहू लागले. मात्र, तेथे ते रमत नव्हते. नंतर ते बहीण ईश्वर कौर यांच्याकडे रहायला गेले. काम नसल्याने ते रोडरोमियोसारखे फिरत होते. सिनेमे पाहणे आणि त्याचे तिकीट विकणे अशी कामे ते करू लागले. जोडीला जुगार खेळणे आणि चोऱ्या करण्याचे प्रकारही सुरू होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा भाऊ माखन सिंग सैन्यात गेला आणि मिल्खा यांचे नाव शाळेत घातले.
मिल्खा सिंग सातवीत शिकत होते. मात्र, शिक्षणात त्यांचे मन रमत नव्हते. १९४९ ला ते सैन्यात दाखल होण्यासाठी प्रयत्न करत होते. लाल किल्ला कॅम्पमध्ये ते भरतीसाठी गेले होते. मात्र, त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी रबराच्या फॅक्टरीत नोकरी पत्करली. मात्र हिट स्ट्रोक आला आणि त्यांनी नोकरी सोडली. पुढे १९५२ मध्ये भावाच्या मदतीने ते सैन्यात भरती झाले. श्रीनगर मधून त्यांना सिकंदराबाद येथे पाठविण्यात आले. तेथे १९५३ मध्ये १० किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धेत ते सहावे आले. त्यानंतर ४०० मीटर ब्रिगेट मीट स्पर्धा खेळली. त्यानंतर ॲथलेटिकपटू गुरुदेवसिंग यांनी त्यांचे प्रशिक्षण घेतले. एका मुलाखतीत मिल्खा सिंग यांनी सांगितले हाेते की, ४०० मीटर रेसमध्ये माझ्या नाकातून रक्त वाहत होते; पण जिंकण्याची धुंदी इतकी होती की, अशा गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता. २०१३ मध्ये त्यांची मुलगी सोनिया सानवालका यांच्या सहाय्याने 'द रेस ऑफ माय लाइफ' हे आत्मचरित्र लिहिले.
वाचा : मोदी सरकारची गुलाम नबी आझाद यांच्यावर कृपादृष्टी, सरकारी बंगल्यात राहण्याची परवानगी