राष्ट्रीय

बिहार : शंभर महिलांचे लैंगिक शोषण; नोकरीच्या आमिषाने केला छळ

Shambhuraj Pachindre

मुजफ्फरपूर; वृत्तसंस्था : बिहारध्ये मुजफ्फरपूर येथील डीबीआर युनिक नेटवर्किंग नावाच्या कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने दीर्घ काळापासून सुमारे शंभर महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पीडितेने यातून स्वत:ची सुटका करत हे प्रकरण चव्हाट्यावर आणले.

न्यायालयाने बुधवारी पीडितेचा जबाब नोंदवला. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी सोमवारी रात्री कंपनीचा व्यवस्थापक तिलक सिंह यास गोरखपूरमधून बेड्या ठोकल्या. कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक मनीष सिन्हासह इतर कर्मचार्‍यांचा शोध सुरू आहे. हे सर्वजण या महिलांवर वारंवार बलात्कार करत होते. एखादी महिला गरोदर राहिल्यास तिचा गर्भपात केला जात होता. तसेच याची कोठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही कंपनीचे संचालक व अन्य कर्मचार्‍यांकडून दिली जात होती, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

नेटवर्किंगची नोकरी देण्याच्या बहाण्याने मनीष सिन्हाने कंपनीत बिहार, उत्तर प्रदेश, बंगालमधून 300 तरुणींना नोकरी दिली होती. तरुणींनी वसतिगृहात राहावे यासाठी तो बळजबरी करत होता, असे पीडित तरुणींनी म्हटले आहे.

पोलिसांचा गलथानपणा

आम्ही अनेकदा पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्यापुढे आमची कैफियत मांडली. मात्र, आम्हाला प्रत्येक वेळी दुर्लक्षित करण्यात आले, अशी माहिती पीडित महिलांनी न्यायालयासमोर दिली.

SCROLL FOR NEXT