बिहारमध्ये पावसाचा कहर ! एका दिवसात ६१ जणांचा मृत्यू (File Photo)
राष्ट्रीय

बिहारमध्ये अवकाळी पावसाचा कहर! एका दिवसात ६१ जणांचा मृत्यू

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: Bihar Weather | नैसर्गिक आपत्तीमुळे बिहारमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसळधार पाऊस, वादळ आणि वीज कोसळल्याने ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. नालंदामध्ये सर्वाधिक २२ जणांचा मृत्यू झाला आहे. झाडे पडून, भिंती कोसळल्याने आणि त्याखाली लोक गाडल्यामुळे ३८ जणांचा मृत्यू झाला. हवामान खराब झाल्यास लोकांना बाहेर न पडण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या बहुतांक भागात ४०-५० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत. नालंदा येथील इस्लामपूर पोलीस स्टेशन परिसरातील बालमत बिघा गावात पूल कोसळला.

गेल्या २४ तासांत पटना येथे सर्वाधिक ४२.६ मिमी पाऊस पडला. तर भागलपूरमध्ये ३६.५ मिमी आणि मधुबनीमध्ये ३६ मिमी पाऊस पडला. वादळ आणि पावसामुळे कमाल तापमानातही घट झाली. पूर्णिया, भागलपूर, पूर्व चंपारण, दरभंगा, सुपौलसह अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान २८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले गेले.

'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारीही (दि.११) अनेक जिल्ह्यांमध्ये एक-दोन ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पूर्णिया, कटिहार, अररिया, किशनगंज, सुपौल, मधुबनी, सहरसा, मधेपुरा, सीतामढी, शिवहार, पश्चिम आणि पूर्व चंपारणमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केला आहे. पाटण्याच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, आज सकाळी सूर्यप्रकाश आहे. थंड वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. तथापि, येथेही हवामान खात्याने पावसाचा इशारा जारी केला आहे. याशिवाय गया, मुझफ्फरपूर, दरभंगा, भागलपूर, बांका, जमुई, खगरिया, बेगुसराय, नालंदा, नवादा, औरंगाबाद, कैमूर, बक्सर, रोहतास आणि भोजपूरमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT