Bihar Politics News | बिहारात ‘इंडिया’त जागावाटपावरून खेचाखेची Pudhari File Photo
राष्ट्रीय

Bihar Politics News | बिहारात ‘इंडिया’त जागावाटपावरून खेचाखेची

राहुल गांधी-तेजस्वी यादव यांच्यातील उबदार संबंधांना तडा

पुढारी वृत्तसेवा

पाटणा; वृत्तसंस्था : बिहारमधील ‘मतदार अधिकार यात्रा’ दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी जनता दलाचे (राजद) नेता तेजस्वी यादव यांच्यातील सलोखा पाहून इंडिया आघाडीत जागावाटप सहज पार पडेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, आता या दोन्ही प्रमुख सहयोगींमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

काँग्रेस पक्ष यात्रेदरम्यान मिळालेल्या मोठ्या जनसमर्थनामुळे उत्साही झाला असून, त्यांनी थेट 70 विधानसभा जागांची मागणी केली आहे. 2020 च्या निवडणुकीत काँग्रेसने याच संख्येवर लढत 19 जागा जिंकल्या होत्या. शिवाय, मागील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या 3 जागांनी पक्षाचा आत्मविश्वास वाढविला आहे. बिहार काँग्रेस अध्यक्ष राजेश राम यांनी चर्चेची अंतिम टप्प्यातील स्थिती स्पष्ट करत, लवकरच घोषणा होईल असे सांगितले.

दरम्यान, राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांनी काँग्रेसच्या कठोर भूमिकेनंतर हस्तक्षेप केला आहे. राजद 52 जागा देण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, काँग्रेसकडून राजदच्या गडांतील 20 ते 25 जागांवर दावा केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसच्या स्वतःच्या आमदारांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. राजदच्या नेत्यांमध्ये आणखी एक नाराजीची बाब म्हणजे राहुल गांधी यांनी अद्याप तेजस्वी यादव यांना आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मान्यता दिलेली नाही. दुसरीकडे, विकासशील इंसान पार्टीचे प्रमुख मुकेश सहनी यांनी आघाडी सत्तेत आल्यास उपमुख्यमंत्रीपदाची मागणी पुढे केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी लोक जनशक्ती पक्ष प्रमुख पशुपती कुमार पारस आणि झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जागावाटप आणखी गुंतागुंतीचे होणार आहे. आघाडीतील सर्व घटक पक्षांची महत्त्वाची समन्वय समिती बैठक 15 सप्टेंबर रोजी पाटण्यात होणार असून, निवडणुकीपूर्वी ऐक्य टिकवण्यासाठी संयम आणि शहाणपणाची मोठी कसोटी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT