Bihar Election 2025
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा आता चांगला उडाला आहे. मतदानाची तारीख जवळ येईल तसा आरोपा-प्रत्यारोपांचा वेग कमालीचा वेगावला आहे. आता प्रचाराचा रणधुमाळी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना हॅलोविन हा विदेशी सण साजरा केला. त्यांचा नातवंडांसोबत हॅलोविन साजरा करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर भाजपने लालू प्रसाद यादव यांनी प्रयागराजमधील महाकुंभावर केलेल्या टीकेचे स्मरण करुन देत जोरदार हल्लाबोल केला आहे.
हॅलोविन हा अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, आयर्लंडमध्ये साजरा केला जाणार सण आहे. दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी हॅलोविन हा मृतांचा सन्मान, भीतीवर विनोदाने मात यासाठी साजरा केला जातो. विविध भयानक, मजेशीर किंवा सुपरहिरो सारखे कपडे परिधान करत हा सण साजरा केला जातो. घराघरांत चॉकलेट्स, कँडीज देतात. घरे आणि परिसर भुतांचे, कोळ्यांचे, जादूटोण्यांचे डेकोरेशन करून सजवत मुले मित्रमैत्रिणींसोबत बोलावून हॅलोविन पार्टी करतात. आत हाच सण लालूप्रसाद यादव यांनी आपल्या नातवंडांबरोबर साजरा केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला. लालू यादव यांच्या कन्या आणि राजद नेत्या रोहिणी आचार्य यांनी ३१ ऑक्टोबर रोजी हॅलोविन सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते आणि लिहिले होते, "सर्वांना हॅलोविनच्या शुभेच्छा."
हॅलोविन सण साजरा केल्यानिमित्त भाजपने लालूप्रसादांवर जोरदार टीका केली आहे. . एका परदेशी सणाला महत्त्व देणाऱ्या यादव यांनी यापूर्वी महाकुंभ मेळ्याला 'अर्थहीन' म्हटले होते, यावरून भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.भाजप किसान मोर्चाने (BJPKM) एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "बिहारच्या लोकांनो, विसरू नका. हा तोच लालू यादव आहे ज्यांनी श्रद्धा आणि अध्यात्माच्या भव्य कुंभाला अर्थहीन म्हटले होते आणि आता ब्रिटिश सण हॅलोविन साजरा करत आहेत. जो कोणी श्रद्धेवर आघात करेल, त्याला बिहारची जनता मतदान करणार नाही."
प्रयागराज येथे महाकुंभला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर एक गर्दी उसळली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला होता. अनेक जण जखमी झले होते. या दुर्घटनेबाबात बोलताना लालूप्रसाद यादव म्हणाले होते की, "कुंभाचा कुठे काही अर्थ आहे. अर्थहीन आहे कुंभ." या विधानामुळे भाजप आणि हिंदू धर्मगुरूंकडून तीव्र टीका झाली होती. आता बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला असताना पुन्हा एकदा कुंभवर केलेल्या विधानावर लालूप्रसाद यादवांची कोंडी झाली आहे.