राष्ट्रीय

Bihar Election 2025 : हेमंत सोरेन यांच्या ‘झामुमो’ची बिहार विधानसभा निवडणुकीतून माघार

Bihar Assembly Elections 2025 : राजद आणि काँग्रेसवर 'राजकीय कटकारस्थानाचा' आरोप.

पुढारी वृत्तसेवा

Bihar Assembly Elections 2025 Hemant Soren's Jharkhand Mukti Morcha

बिहार विधानसभा निवडणुकीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा’ (झामुमो) निवडणुकीतून माघार घेतली आहे. सोमवारी (दि. २०) हा निर्णय जाहीर करण्यात आला.

बिहारमध्ये जागावाटपाचा तिढा

बिहारमधील जागावाटपावरून सध्या राजकारण तापले आहे. अशातच झारखंडमधील सत्ताधारी झामुमोने काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) सोबतच्या आपल्या महागठबंधनाची 'समीक्षा' करणार असल्याचे म्हटले आहे. बिहार निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर झामुमोने राजद आणि काँग्रेसवर 'राजकीय कटकारस्थानाचा' आरोप केला आहे.

झारखंडच्या राजकारणावरही संभाव्य परिणाम

सोरेन यांच्या पक्षाने (झामुमोने) ज्या पद्धतीने बिहार निवडणुकीतून स्वतःला बाजूला केले आहे, त्यामुळे आता याचे परिणाम झारखंडच्या राजकारणावरही दिसू शकतात, अशी चर्चा आहे. जाणकारांच्या मते, झामुमोला बिहार निवडणुकीत धोका देण्यात आला आहे.

पेच नेमका कुठे अडला?

हेमंत सोरेन यांच्या पक्षाने बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार आणि सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार असे जाहीर केले होते. पण अवघ्या दोनच दिवसांत ही निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. याचे या मागे जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्याचे कारण आहे असे बोलले जात आहे.

झामुमोने शनिवारी (दि. १८) चकाई, धमदाहा, कटोरिया, मनिहारी, जमुई आणि पीरपैंती या जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. दुसऱ्या टप्प्यातील या जागांसाठी नामांकन अर्ज भरण्याची अंतिम मुदत सोमवारी (दि. २०) होती.

राज्याचे पर्यटन मंत्री कुमार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘राजद आणि काँग्रेस एका राजकीय कटकारस्थानांतर्गत झामुमोला निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवण्यास जबाबदार आहेत. झामुमो याचे प्रत्यत्तर देईल आणि राजद व काँग्रेससोबतच्या आमच्या आघाडीची समीक्षा करेल.’

बिहार विधानसभा निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण तारखा

बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागांसाठी निवडणूक दोन टप्प्यांत होणार आहे. राज्यात आगामी ६ नोव्हेंबर (पहिला टप्पा) आणि ११ नोव्हेंबर (दुसरा टप्पा) या तारखांना मतदान होईल. तर, निवडणुकीचा निकाल (मतमोजणी) १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT