नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १८ जिल्ह्यांतील १२१ मतदारसंघामध्ये गुरुवारी मतदान झाले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.१३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान झाले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागांमध्ये मतदारांचा उत्साह कमी दिसला.
पहिल्या टप्प्यातील १२१ विधानसभा मतदारसंघात एकूण १ हजार ३१४ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये १ हजार १९२ पुरुष आणि केवळ १२२ महिलांचा समावेश होता. या सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले. बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १०२ मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते. तर १९ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव होते.
बेगुसराय जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ६७.३२ टक्के मतदान झाले, तर शेखपुरा जिल्ह्यात सर्वात कमी ५२.३६ टक्के मतदान झाले. बिहारची राजधानी पाटणामध्ये ५५.०२ टक्के मतदान झाले. १२१ जागांपैकी तीन जागांवर सर्वात कमी मतदान झाले. यामध्ये पाटणामधील शहरी भागात कुम्हरार येथे ३९.५२%, दिघा येथे ३९.१०% आणि बांकीपूर येथे ४०% मतदान झाले.
पहिल्या टप्प्यात सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा या दोन उपमुख्यमंत्र्यांसह १८ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच विरोधी पक्षाच्या आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव, लालूप्रसाद यादव यांचे जेष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील २० जिल्ह्यांच्या १२२ मतदारसंघामध्ये ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.