नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांद्वारे लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या 'भूपाळी ते भैरवी' या कार्यक्रमास ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, ताल कटोरा स्टेडियममधील डॉ . बाबासाहेब आंबेडकर सभामंडपामध्ये हा लोककलेचा जागर झाला. साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली. परिसंवाद आणि इतर कार्यक्रमाकडे पाठ फिरवणाऱ्या मंडळींनी देखील या लोककलेचा कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचे निदर्शनास आले. लोकसाहित्याचा अभ्यासक आणि संशोधक असलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच आमदार विश्वजीत कदम देखील उपस्थित होते.
सांगलीचे संपत कदम आणि त्यांचा संघ प्रस्तुत 'भूपाळी ते भैरवी' कार्यक्रमाची सुरुवात गणरायाला वंदन करून झाली. हरवत चाललेल्या लोककला, नृत्य, नाट्य या अभिनयाने कार्यक्रम खुलत गेला. भल्या पहाटेची भूपाळी, जात्यावर दळण दळताना गायिली जाणारी ओवी, भल्या पहाटे कुडमुड्याच्या निनादात व्हणार सांगत येणारा 'पिंगळा' जोशी, अठरा पिढ्यांचा इतिहास सांगणारा हेळवी, लोकसंस्कृतीचा उपासक वासुदेव, खदखदून हसवणारा बहुरूपी, अंगावर आसूड ओढणारा पोतराज, कडकलक्ष्मीवाला, नटखट गवळण, विनोदातून अध्यात्म सांगणारं भारूड, लोकनाट्यातील खुसखुशीत बतावणी, ढंगदार लावणी, मोटेवरचं गीत, नंदीबैल, कोळीनृत्य, आदिवासी नृत्य, धनगरी ओव्या, एकात्मतेची नाळ जोडणारी भैरवी आदींचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपत कदम आणि कृष्णात पाटोळे यांचे स्वागत आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले.