भंडारा: भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रबोधनकार कला साहित्य संघटनेद्वारे वृद्ध कलाकारांना पेन्शन देण्यात यावी आणि इतर अन्य मागण्यांसाठी आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संगीतमय धरणे आंदोलन करण्यात आले. यात ‘पेन्शन को खा बैठे, खुर्सीपर बैठे चोर’ अशा विविध गीतांच्या माध्यमातून त्यांनी आपल्य भावना इतरांसमोर मांडल्या. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील कलावंत संघटना गेल्या पाच वर्षांपासून वृद्ध कलाकारांना मानधन व पेन्शन देण्याच्या मागणीकरिता विविध ठिकाणी आंदोलन करून व निवेदन देऊन आपल्या मागण्या रेटून धरत आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनोज कोटांगले यांनी केला आहे. जिल्हयातील सर्वस्तरीय कलांवत असून वृद्ध कलावंताची पेन्शन मिळावी यासाठी २०१९-२० पासून त्यांनी पंचायत समितीमध्ये ऑफलाइन अर्ज सादर केलेले आहेत. परंतू जिल्ह्यात कलावंतांची मानधनाकरिता निवड समिती नसल्यामुळे त्यांच्या अर्जांची तपासणी झाली नाही. त्यामुळे कोणाचीही निवडसुद्धा झालेली नाही. याकरिता ही संघटना गेल्या पाच वर्षांपासून विविध पातळीवर निवेदने व आंदोलन करून आपल्या मागणीचा पाठपुरावा करत आहे.
मार्च २०२४ पासून कलावंताचे ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. परंतु, २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांमध्ये वृद्ध कलावंतांनी भरलेले ऑफलाइन अर्जाची छाननी व निवड अगोदर करण्यात यावी. जेणेकरून मागील तीन वर्षांपासून ज्यांनी ऑफलाइनअर्ज केला आहे. त्या कलावंतांवर अन्याय होणार नाही व ते मानधनापासून वंचित राहणार नाही, अशी मागणी या संघटनेद्वारे करण्यात आली आहे.
आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौकात परमानंद मेश्राम व मनोज कोटांगले यांच्या नेतृत्वात संगीतमय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भावेश कोटांगले, धनंजय धकाते, भगवान दहिवले, नाशिक चवरे, तीर्थानंद बोरकर, यशवंत बागडे, सुशिल खांडेकर, वासुदेव कोचे, प्रल्हाद भुजाडे यांच्यासह वेगवेगळ्या गावांहून आलेले विविध क्षेत्रातील कलाकारांनी या आंदोलनात सहभाग घेतला. नंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला पाठविले.