पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलींचे संरक्षण आणि सक्षमीकरण करण्यासाठी २२ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान मोदी यांनी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' (Beti Bachao Beti Padhao) अभियानाला सुरूवात केली. याला आज १० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी या चळवळीला तळागाळात पोहचवणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो, अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली आहे.
गेल्या दशकात 'बेटी बचाओ बेटी पढाओ' (Beti Bachao Beti Padhao) हा लोक-शक्तीचा उपक्रम बनला आहे. येणारी वर्षे मुलींसाठी मोठी संधी आणि प्रगती घेऊन येतील, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.
महिला आणि बाल विकास मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मानव संसाधन विकास मंत्रालय या तीन मंत्रालयांद्वारे 'बेटी बचाओ बेटी पढाओ' (Beti Bachao Beti Padhao) अभियान राबविली जाते. २२ जानेवारी २०१५ रोजी हरियाणातील पानिपत येथे पंतप्रधान मोदी यांनी या मोहिमेची सुरुवात केली. आज १० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्त पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले की, आपण आपल्या मुलींच्या हक्कांचे रक्षण करत राहूया, त्यांचे शिक्षण सुनिश्चित करूया आणि असा समाज निर्माण करूया जिथे त्या कोणत्याही भेदभावाशिवाय भरभराटीला येतील. येणारी वर्षे भारतातील मुलींसाठी आणखी मोठी प्रगती आणि संधी घेऊन येतील.'
'लोक आणि विविध सामुदायिक सेवा संस्थांच्या समर्पित प्रयत्नांमुळे 'बेटी बचाओ बेटी पढाओ' (Beti Bachao Beti Padhao) ने उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या कमी बाल लिंग गुणोत्तर असलेल्या जिल्ह्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत आणि जागरूकता मोहिमांनी लिंग समानतेचे महत्त्व खोलवर रुजवले आहे. ही योजना लिंगभेदांवर मात करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचवेळी मुलींना शिक्षण आणि तिच्या स्वप्नांना साध्य करण्यासाठी संधी मिळतील याची खात्री करण्यासाठी योग्य वातावरण तयार केले आहे. आज आपण या चळवळीला १० वर्षे पूर्ण करत आहोत. गेल्या दशकात, ही एक परिवर्तनकारी, लोक-शक्तीचा उपक्रम बनली आहे आणि सर्व स्तरातील लोकांचा सहभाग यामध्ये आहे.'