बंगळूर : तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल स्पर्धा पहिल्यांदाच जिंकणार्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाचा परमोच्च आनंद अल्पजीवी ठरला. आरसीबी संघाचा अचानक ठरवण्यात आलेला विजयोत्सव याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी बुधवारी हजारो चाहत्यांनी बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकाच वेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात काही अल्पवयीनांसह 7 युवक आणि
4 युवतींचा समावेश आहे. 50 चाहते जखमी आहेत. पैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींवर बौरिंग आणि वैदेही या दोन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आरसीबी संघाचा विधानभवनासमोर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. त्यामुळे सुमारे एक लाख चाहत्यांनी स्टेडियमकडे धाव घेतल्यानंतर स्टेडियमबाहेर गर्दी होऊन ही चेंगराचेंगरी झाली. तत्पूर्वी आरसीबी संघ स्टेडियममध्ये चषक उंचावून चाहत्यांना अभिवादन करत होता. त्याचवेळी चेंगराचेंगरीची माहिती मिळाल्यानंतर पुढचा विजयोत्सव रद्द करण्यात आला. अशाप्रकारे विजय आणि आनंदोत्सवाचे रूपांतर शोकसागरात झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दुर्घटनेबद्दल जनतेची माफी मागितली आहे.
चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला. कोणतीही पूर्वतयारी न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिस सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत जखमींना मदत आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. मृतांमध्ये काही अल्पवयीन युवकही आहेत. गेटमधून अनेक लोकांनी एकाचवेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने काही जण खाली पडले आणि गर्दीच्या पायांखाली तुडवले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. स्टेडियमच्या बाहेर आधीपासून पोलिस बंदोबस्त होताच. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण बहुतेकजणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. चेंगराचेंगरीचे वृत्त कळताच पोलिस बंंदोबस्तात वाढ करण्यात आली. दुर्घटनेची माहिती बंगळूर शहरभर पसरताच अनेकांनी आपल्या कुटुंबातील लोकांची चौकशी करण्यासाठी रुग्णालयांकडे धाव घेतली. त्यामुळे दोन्ही रुग्णालयांजवळही गर्दी जमली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागत आहे. मृतांचे कुटुंबीय आणि जखमींच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे.
मंगळवारी 3 जूनरोजी रात्री आरसीबीने पंजाब सुपरकिंग्लजा 6 धावांनी हरवत पहिल्यांदाच आयपीएल चषक जिंकल्यानंतर बुधवारी विशेष विमानाने एचएएलच्या विमानतळावर आगमन झाले. तेथे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी संघाचे स्वागत केले.
विमानतळावरून चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत खेळाडूंची खुल्या बसमधून मिरवणूक काढण्याचा निर्णय झाला होता. मात्र बंगळूरमध्ये मंगळवारी रात्रीपासूनच चाहत्यांचा जल्लोष सुरू होता. तो बुधवारीही कायम होता. रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली हजारो चाहते दुतर्फा उभे होते. त्यामुळे आरसीबी संघाची खुल्या बसमधून मिरवणूक सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही, असे पोलिस प्रशासानाने कळवल्यानंतर ही मिरवणूक रद्द करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारकडून विधान भवनासमोर खेळाडूंचा सत्कार केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी खेळाडूंना विधानसौधमध्ये आणले. तेथे मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांच्या हस्ते आरसीबी कर्णधार रजत पाटीदार, मुख्य खेळाडू विराट कोहला, अंतिम सामन्यातील सामनावीर कृणाल पंड्या यांच्यासह संपूर्ण संघाचा म्हैसूर पगडी आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यासह जवळपास पूर्ण मंत्रिमंडळ सत्कार सोहळ्याला हजर होते. यावेळीही चाहते मोठ्या संख्येने हजर होते. मात्र विधान भवनाचा परिसर बंदिस्त नाही. शिवाय पोलिस बंदोबस्त आधीपासूनच तैनात होता. त्यामुळे इथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने घातलेला घोळ हे चेंगराचेंगरीचे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. आरसीबी संघाचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानभवन इमारतीसमोर झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी संघ एम. चिन्नास्वामी क्रीडांगणावर पोचेल आणि तेथे चाहत्यांना मोफत प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा संघटनेने सोशल मीडियावर केली. त्यामुळे हजारो चाहते विधान भवनासमोर सत्कार सोहळा सुरू असतानाच स्टेडियमकडे रवाना झाले. तथापि, चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता केवळ 35 हजार आहे. मात्र सुमारे लाखभर चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती क्रिकेट संघटनेच्या पदाधिकार्यांना मिळाल्यानंतर अचानक संघटनेने निर्णय बदलला आणि केवळ पासधारक आणि तिकीटधारकांना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा केली. तसेच पास आणि तिकिटांचे वितरण सुरूही केले. हे पास आणि तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली. गर्दीवर नियंत्रण अशक्य झाले. त्यामुळे क्रीडांगण अधिकार्यांनी पोलिसांना पाचारण केले. पण गर्दी पोलिसांच्याही नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे इतक्या चाहत्यांना पास आणि तिकीट वितरण शक्य होणार नाही, हे लक्षात येताच क्रिकेट संघटनेने पुन्हा निर्णय बदलला आणि स्टेडियमचे सारे गेट एकाचवेळी खुले केले. गेट खुले होताच एकाच वेळी हजारो लोकांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
दुपारी 12 वाजल्यापासूनच आरसीबीचे चाहते विधान भवन आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर येऊ लागले होते. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लहान मुलांनी पालकांसह स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. गर्दी झालेली असतानाच पावसाच्या सरी कोसळू लागल्या. त्यामुळे लोक इकडे-तिकडे धावू लागले. यातूनच स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चेंगराचेंगरी झाली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने स्टेडियमबाहेर गोंधळ उडाला. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या एका व्हिडीओत, पोलिस स्टेडियमच्या गेटजवळ गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करताना दिसत आहेत.
‘आरसीबी’च्या विजय परेडमध्ये उपस्थित असलेल्या महेश नावाच्या चाहत्याने सांगितले की, हजारो लोक विराट कोहली आणि ‘आरसीबी’ संघाला पाहण्यासाठी आले होते. अनेक मुली एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यातील काही मुलींना मी पडताना पाहिले. मात्र, कोणीही त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले नाही. तिथे प्रचंड गर्दी असल्याने पोलिसही हतबल झाले होते.
दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जनतेची माफी मागितली आहे. त्यांनी सांगितले की, गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने गोंधळ उडाला. मोठी गर्दी झाल्याबद्दल मी माफी मागतो. आम्ही 5 हजारांहून अधिक कर्मचार्यांची व्यवस्था केली. तथापि, ही ‘आरसीबी’च्या चाहत्यांची उत्साही गर्दी असल्याने आम्ही त्यांच्यावर लाठीमार करू शकलो नाही.
खुल्या बसमधून मिरवणुकीचा निर्णय रद्द झाल्यानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (केएससीए) अचानक चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे विधान भवनासमोर जमलेले चाहते स्टेडियमकडे रवाना झाला. तत्पूर्वी विराट कोहलीने अहमबादमध्ये सांगितले होते की, आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबीच्या वतीने चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव साजरा करण्यात येईल. आरसीबीकडून याआधी लढणारे ए. बी. डिव्हिलियर्स, ख्रिस गेल आणि मी स्वत: आम्ही उद्या बंगळूरला येऊ. आम्ही हा कप तिथल्या चाहत्यांना समर्पित करू आणि चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजय साजरा करू. मात्र केएससीएने या निर्णयावर बुधवारी दुपारी 12 च्या दरम्यान शिक्कामोर्तब केले आणि तशी घोषणा सोशल मीडियावरून केली.