सौपिकाने मेट्रोत व्हिडिओ शूट करणाऱ्या सहप्रवाशाला रंगेहात पकडले.  Pudhari News
राष्ट्रीय

Metro Viral video : "मी अक्षरशः थरथर कापत होते...": मेट्रोत व्हिडिओ शूट करणाऱ्या सहप्रवाशाला तरुणीने रंगेहात पकडले

बंगळूरमधील संतापजनक प्रकार, पसार झालेल्या सहप्रवासी तरुणाचा पोलिसांकडून शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

Bengaluru Metro Video recording incident : बंगळुरू मेट्रोमध्ये प्रवास करत असताना सहप्रवाशाने गुपचूप चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार एका तरुणीच्या सतर्कतेमुळे निदर्शनास आला. या संतापजनक प्रकारानंतर तिने संबंधिताला जाब विचारला. या संबंधित व्यक्तीविरुद्ध थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अशा प्रकारच्या विकृतीला चाप लावण्यासाठी तरुणीने केलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर

तरुणीने इन्स्टाग्रामवर स्वतःची ओळख सौपिका अशी दिली. तिने मंगळवारी दुपारी व्हाईटफिल्ड मेट्रो मार्गावरील ट्रेनमध्ये घडलेली घटना शेअर केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ती अत्यंत व्यथित दिसत आहे. मोबाईल फोनवर व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या आरोपीला तिने जाब विचारला. तसेच त्याचा फोन अनलॉक करण्याची मागणी कशी केली, याची माहिती दिली आहे.

"मी या क्षणी अक्षरशः थरथर कापत आहे..."

व्हिडिओमध्ये सौपिका म्हणते की, "मी या क्षणी अक्षरशः थरथर कापत होते. मेट्रोमध्ये माझे रेकॉर्डिंग करणाऱ्या एका व्यक्तीला मी रंगेहात पकडले आहे." यावेळी तिने घटनेच्या वेळी आपण परिधान केलेले कपडे दाखवत, आपण पूर्ण कपडे घातलेले असतानाही ही घटना घडल्याचे नमूद केले. माझे शरीर उघडे नव्हते, असे सांगत तिने घडलेल्या प्रकाराशी तिच्या पेहरावाचा काहीही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले.

मेट्रोमध्ये तरुणीचा जाब विचारण्याचा प्रकार

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सौपिका संबंधित व्यक्तीला जाब विचारताना आणि वारंवार "तू माझे रेकॉर्डिंग का करत होतास?" असे विचारताना दिसत आहे. तसेच तिने त्याला फोन अनलॉक करण्यासही सांगितले. त्यावर तो व्यक्ती "मी उघडतो, फोन द्या," असे उत्तर देतो. या वादादरम्यान मेट्रोचे सुरक्षा रक्षकही तेथे उपस्थित असल्याचे दिसून येते.

माफी मागत चूक केली कबूल

यानंतरचा व्हिडिओ मेट्रोच्या लिफ्टमधील संवादाचा आहे. यामध्‍ये सौपिका संबंधित व्यक्तीला सांगते, "मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणार आहे." यावर तो व्यक्ती "मला माफ करा," असे म्हणतो. "तुम्ही माफी मागताय? म्हणजे तुम्ही मान्य करताय की तुम्ही माझे रेकॉर्डिंग केलेत?" त्यावर तो व्यक्ती "नाही" असे उत्तर देतो, तर ती म्हणते, "मी तुम्हाला पकडले आहे. तुम्हाला शिक्षा होईल याची मी नक्कीच काळजी घेईन." व्हिडिओमध्ये पुढे ती पुन्हा एकदा त्याला फोन अनलॉक करून पासवर्ड देण्यास सांगताना दिसते. मात्र, ती फोन उघडण्यास सांगत असतानाच तो फोन घेऊन तिथून निघून जातो.

तरुण फोन घेऊन झाला पसार

मेट्रो ट्रेन थांबल्यावर संबंधित तरुण फोन घेऊन पळून गेल्याचा आरोप सौपिकाने केला आहे. व्हिडिओमध्ये तिने म्हटले आहे, "मी त्याचा फोन ताब्यात घेऊन सुरक्षारक्षकांकडे दिला होता; पण त्याने तो हिसकावून पळ काढला. बेंगळुरूच्या नागरिकांनो, कृपया या व्यक्तीला, त्याच्या कंपनीला आणि त्याच्या कुटुंबीयांना शोधा. मी मेट्रो स्टेशनवर अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ७ दिवसांत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे."

तात्काळ कारवाईबद्दल तरुणीने पोलिसांचे मानले आभार

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तरुणीने या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तात्काळ सुरू केलेल्या कारवाईनंतर तरुणीने पोलिसांचे आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT