Bengaluru Family Murder Case Pudhari
राष्ट्रीय

Family Murder Case: देश हादरला! कॅब चालकाने कुटुंबातील 7 जणांची केली हत्या; पत्नीपासून सासरच्या मंडळींपर्यंत कुणालाही सोडलं नाही

Bengaluru Family Murder Case: बंगळुरूमध्ये कौटुंबिक वादातून एका कॅब चालकाने पत्नी, सासू, मेव्हणे, मेहुणी आणि सात वर्षांच्या मुलासह सात जणांची हत्या केल्याचा आरोप आहे.

Rahul Shelke

Bengaluru Family Murder Case: बंगळुरूमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका कॅब चालकाने कौटुंबिक वादातून स्वतःच्या पत्नी, सासू, मेव्हणे, मेहुणी आणि एका सात वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. इंदुशेखर असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने सात जणांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिसांना एका सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला असून, इतर सहा जणांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल?

प्राथमिक तपासात या हत्यांमागे कौटुंबिक वाद असल्याचे समोर आले आहे. आरोपी इंदुशेखर हा पत्नी सुनीता हिच्या माहेरच्या लोकांशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे नाराज होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.

इंदुशेखर आणि सुनीता यांचे लग्न होऊन जवळपास 20 वर्षे झाली होती. मात्र, सुनीता वारंवार माहेरी जात असल्यावरून दोघांमध्ये वाद होत असत. कुटुंबातील सदस्यांनी अनेकदा दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यातील मतभेद कायम राहिले.

सुनीताला तिच्या आई आणि भावांचा पाठिंबा मिळत असल्याने इंदुशेखर अधिकच नाराज होता. याच रागातून त्याने संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.

पत्नीपासून सुरुवात, नंतर सासरच्या सहा जणांची हत्या

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने या हत्यांचे आधीच नियोजन केले होते. त्याने सर्वप्रथम पत्नी सुनीता हिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह कपड्यात गुंडाळून नंदी हिल्स परिसरात फेकून दिला.

सुनीताचा मृतदेह लपवल्यानंतर आरोपीने तिचा मोबाईल बंद केला. तसेच ती बाहेर फिरायला गेल्याचे त्याने शेजाऱ्यांना सांगितले. त्यामुळे सुरुवातीला कोणालाही संशय आला नाही.

यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने सुनीताचे भाऊ शिवकुमार आणि शंकर यांना पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावले. तिथे त्याने दोघांचीही हत्या केली. त्यानंतर त्याने त्यांच्या पत्नी दिव्या आणि नलिनी, तसेच स्वतःची सासू रूपवती आणि सात वर्षांचा मुलगा पुनीत याचीही हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने दोन दिवसांत या सात हत्या केल्या.

मृतांमध्ये पत्नी, सासू आणि दोन मेव्हण्यांचा समावेश

या घटनेत मृत्यू झालेल्या सात जणांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यामध्ये आरोपीची पत्नी सुनीता, सासू रूपवती, मेव्हणे शिवकुमार आणि शंकर, मेहुणी दिव्या आणि नलिनी यांच्यासह सात वर्षांच्या पुनीतचा समावेश आहे.

ही घटना राजाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसारूम सर्कलजवळील 59व्या क्रॉस परिसरातील एका निवासी भागात घडल्याची माहिती आहे.

घरातील रक्ताचे डाग पुसण्यासाठी केमिकलचा वापर?

हत्येनंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. घरातील रक्ताचे डाग पुसण्यासाठी त्याने रसायनांचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी एक कार जप्त केली आहे. तसेच हत्यांसाठी वापरलेला दगडी पाटा-वरवंटाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

नंदी हिल्स परिसरात सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी नंदी हिल्सच्या पायथ्याशी शोधमोहीम राबवली. जवळपास चार तासांच्या शोधानंतर त्यांना सात वर्षांच्या पुनीतचा मृतदेह सापडला.

मात्र, इतर सहा जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. आरोपीने सातही जणांची हत्या केल्याचा दावा केला असला, तरी पोलिसांकडून त्याच्या दाव्यांची पडताळणी केली जात आहे.

बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर प्रकरण उघड

गुरुवारी नलिनीच्या आईने श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात कुटुंबातील सदस्य बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला आणि पोलिसांनी इंदुशेखरला अटक केली.

या हत्यांमध्ये आरोपीला आणखी कोणाची मदत मिळाली होती का, याचाही तपास सुरू आहे. आरोपीच्या मुलीची या प्रकरणात काही भूमिका होती का, याचीही पोलीस चौकशी करत आहेत.

विशेष म्हणजे, निवासी परिसरात हे सर्व घडत असताना शेजाऱ्यांना याची माहिती कशी मिळाली नाही, याचाही तपास पोलीस करत आहेत. सध्या या प्रकरणातील इतर मृतदेहांचा शोध आणि हत्यांशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT