Belgium India Relations | पाकसोबत कोणतेही संरक्षण सहकार्य नाही; बेल्जियमचे भारताला आश्वासन 
राष्ट्रीय

Belgium India Relations | पाकसोबत कोणतेही संरक्षण सहकार्य नाही; बेल्जियमचे भारताला आश्वासन

बेल्जियमच्या पंतप्रधानांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत कोणतेही संरक्षण सहकार्य न करण्याचे आश्वासन बेल्जियमचे संरक्षणमंत्री थिओ फ्रँकेन यांनी गुरुवारी भारताला दिले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २०२५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांनी निषेध केला असून, भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवण्याची ग्वाही दिली. सीमापार दहशतवादासह दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला आपला पाठिंबा व्यक्त केला.

​गुरुवारी भारत सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘दोन्ही नेत्यांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक आणि जागतिक दृष्टिकोनाबाबत आपल्या कटिबद्धतेवर भर दिला. कोणत्याही स्वरूपातील, कोणत्याही रूपातील आणि कुठल्याही ठिकाणच्या दहशतवादाचे कधीही समर्थन केले जाऊ शकत नाही, यावर दोन्ही नेत्यांनी एकमत दर्शवले.’’

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि बेल्जियमचे संरक्षणमंत्री थिओ फ्रँकेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. ​सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत राजनाथ सिंह यांनी बेल्जियम संरक्षण तंत्रज्ञान किंवा कौशल्य पाकला मिळण्याची शक्यता असल्याबाबत भारताच्या चिंता उपस्थित केल्या.

बेल्जियमच्या पंतप्रधानांना मोदी यांच्याकडून खास भारतीय मेजवानी

बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट दे वेव्हर यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील हैदराबाद हाऊस मध्ये देशभरातील विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांसमवेत गुरुवारी दुपारी अस्सल भारतीय शाकाहारी भोजनाची मेजवानी दिली. ज्येष्ठ सारंगी वादक मोहम्मद आयुब, बासरी वादक हर्षित पाठी आणि अभिजित कलीता यांच्या तबला साथीने यावेळी भारतीय संगीताचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.

भारत-बेल्जियम संरक्षण सहकार्याला गती

नवी दिल्ली; प्रशांत वाघाये : बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट वेव्हर यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी संरक्षण, व्यापार - गुंतवणूक, ऊर्जा, सुरक्षा आणि संस्थात्मक सहकार्य वाढविण्यासाठी गुरुवारी दहा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. यामध्ये संरक्षण सहकार्याबाबत ‘लेटर ऑफ इंटेंट’, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सामंजस्य करार तसेच पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या लक्ष्याचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हा द्विपक्षीय संबंधांचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. दोन्ही देशांमधील लष्करी देवाणघेवाण आणि प्रशिक्षण वाढविण्याचा निर्णय झाला आहे. संरक्षण क्षेत्रातील सहविकास आणि सहउत्पादनाच्या नव्या संधी निर्माण करण्यासह गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि गुन्हेगारी विरोधातील सहकार्यही मजबूत केले जाणार आहे. भारत-बेल्जियम भागीदारी पारंपरिक क्षेत्रांच्या पलीकडे गेली असून, संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जेसारख्या धोरणात्मक क्षेत्रांत सहकार्य वाढले आहे.

सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जेत सहकार्य तसेच नवीकरणीय ऊर्जेसंदर्भातील सामंजस्य करारामुळे शाश्वत विकासातील सहकार्याला गती मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, सायबर गुन्हे आणि संबंधित बाबींवर सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. बेल्जियम कंपन्यांसाठी भारतात ‘इन्व्हेस्टमेंट फास्ट ट्रॅक मेकॅनिझम’ स्थापन करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT