नवी दिल्ली : बीड प्रकरण समोर आल्यावर बिहारला का शिव्या घालतो, असे वाटते अशी खंत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी बोलून दाखवली. मराठी साहित्य संमेलनात 'सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य' या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अशोक वानखेडे बोलत होते.
अशोक वानखेडे म्हणाले की, साहित्य संमलेनात ते लोक असतात ज्यांना साहित्याचा गंध नसतो.ज्या प्रमाणे संमेलनाध्यक्षा म्हणाल्या की, बौद्धिक शरणागतीला ज्ञानाने विरोध केला पाहिजे, तर सामाजिक शरणागतीला साहित्यिकांनी विरोध केला पाहिजे. महाराष्ट्रात 'कटेंगे तो बटेंगे' यासारखे नारे दिले जातात आणि आपण टाळ्या वाजवतो हे दुर्दैव आहे. 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' असे आपण म्हणतो मात्र 'दिल्लीच्या पालख्या वाहतो महाराष्ट्र माझा,' अशी परिस्थिती आज झाली आहे.
साहित्यिकांना आवाहन करताना ते म्हणाले की, उत्तम साहित्य निर्मिती झाली पाहिजे, हा प्रयत्न सर्वांचा असला पाहिजे. साहित्यिकांनी सरकारी साहित्यिक होऊ नये आणि पुरस्कारासाठी साहित्य निर्मिती करू नये नाहीतर साहित्यात पूर्वजांसारखे काम होणार नाही, असे परखड मत त्यांनी मांडले.
दिल्लीत राहत असताना महाराष्ट्र हा सर्वसमावेशक आहे याचा आम्हाला गर्व होता. मराठी लोकांचे राजकारण खेळीमेळीचे होते. आता थेट शिव्या, शाप आणि धमकीची भाषा वापरली जाते, हे मनाला वेदना देणारे असल्याचे वानखेडे म्हणाले.
याच परिसंवादात बोलताना मान्यवरांच्या बोलण्यातून शेवटच्या क्षणी तरी मने जोडली पाहिजेत, सर्वांचा शेवट सारखाच असतो. त्यामुळे पसायदानात असलेली भावार्थ मागणी पूर्ण व्हावी, असा सूर उमटला.