नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा औपचारिक समारोप करणारा पारंपरिक ‘बीटिंग रिट्रीट’ समारोह शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीतील विजय चौक येथे दिमाखात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच तिन्ही सेना दलाचे प्रमुख उपस्थित होते. या समारंभात भारतीय सशस्त्र दलांचा जोश, शिस्त आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी दर्शन घडले.
समारोहाच्या सुरुवातीला तिन्ही सैन्यदलांनी राष्ट्रपतींना अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला आणि राष्ट्रगीत सादर करण्यात आले. तिन्ही सैन्यदलांच्या बँडने ‘कदम-कदम बढाए जा’ या प्रेरणादायी गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या ऐतिहासिक सैन्यपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, बीटिंग रिट्रीट समारोह हा भारतीय सशस्त्र दलांच्या अनुशासन, एकात्मता आणि गौरवशाली परंपरेचे प्रतीक आहे. विजय चौक इथे भव्य स्वरूपात होणारा हा सोहळा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
समारोहादरम्यान पाइप्स अँड ड्रम्स बँडने ‘अतुल्य भारत’, ‘वीर सैनिक’, ‘मिली-जुली’, ‘नृत्य सरिता’, ‘मरूनी’ आणि ‘झेलम’ या सुरेल गीतांचे सादरीकरण केले. तसेच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या बँडने ‘विजय भारत’, ‘हथरोही’, ‘जय हो’ आणि ‘वीर सिपाही’ या देशभक्तीपर रचना सादर केल्या. समारोपाच्या टप्प्यात मास बँडने ‘भारत की शान’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘ड्रमर्स कॉल’ या गीतांनी वातावरण भारावून टाकले. शेवटी 'सारे जहाँ से अच्छा’ या गीतासह बीटिंग रिट्रीट समारोहाचा समारोप झाला.