जबलपूर : बर्गी धरणातील उलटलेल्या क्रूझच्या अवशेषांची पाहणी करताना लष्करी जवान.  -
राष्ट्रीय

Bargi dam cruise accident | बर्गी दुर्घटनेतील मृतांची संख्या ९; चौघे बेपत्ता

लष्करी पाणबुड्यांसह २०० जण बचाव कार्यात

पुढारी वृत्तसेवा

जबलपूर; वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील बर्गी धरणातील क्रूझ बोट दुर्घटनेनंतर शनिवारी शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात आली. या भीषण अपघातात आतापर्यंत ९ जणांचे मृतदेह मिळाले असून, एक पुरुष आणि तीन लहान मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराचे पाणबुडे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक पाणबुडे मिळून २०० हून अधिकजण बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बर्गी धरणाच्या पाणलोट भागात शोधाचा परीघ ५ किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आला आहे. शनिवारी पहाटे ५ वाजल्यापासून मोहीम पुन्हा सुरू झाली.

बेपत्ता चारजणांचा शोध सुरू

बेपत्ता असलेल्यांमध्ये खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचारी कामराज, त्यांचा ५ वर्षीय मुलगा तमिळ, तसेच विजय सोनी (६) आणि मयूरम (५) यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी राघवेंद्र सिंह यांनी या चौघांचा शोध सुरू असल्याची पुष्टी केली आहे.

अचानक आलेल्या वादळामुळे गुरुवारी संध्याकाळी ही क्रूझ बोट सुमारे ६ वाजता धरणात बुडाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जोरदार वाऱ्यांमुळे पाणी खवळले होते आणि प्रवाशांनी बोट किनाऱ्याकडे वळवण्याची विनंती केली होती. या दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी बोट कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. लाईफ जॅकेटस्‌‍ वेळेवर न देणे, सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणे आणि आपत्कालीन स्थितीत गोंधळ उडाल्याचे आरोप केले आहेत. सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, तिघा कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तसेच, अशा प्रकारच्या इतर नौकांच्या संचालनावरही बंदी घातली आहे.

४३ पैकी २८ जणांना वाचवले

पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये ४३ जण बोटीकडे जाताना दिसले असून, आतापर्यंत ४१ जणांची ओळख पटली आहे. त्यातील २८ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT