पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युक्रेन दौऱ्यावर आहेत. आज (दि.२३ ऑगस्ट) ते युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले, यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची देखील भेट घेतली. तसेच येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट केली आहे. यामध्ये युक्रेनमधील कीव येथे महात्मा गांधींना त्यांनी आदरांजली वाहिली असल्याचे म्हटले आहे. बापूंचे आदर्श वैश्विक आहेत आणि लाखो लोकांना आशा देतात. त्यांनी मानवतेला दाखवलेल्या मार्गावर आपण सर्वांनी आचरण करूया, असा सल्ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मारिन्स्की पॅलेसमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मारिन्स्की पॅलेस पूर्णपणे सजवण्यात आला आहे. १९९१ नंतर भारतीय पंतप्रधानांचा हा दौरा आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युक्रेनचा हा पहिलाच दौरा आहे. कीव दौऱ्यावर पंतप्रधान मोदींसोबत परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही असल्याचे समोर आले आहे.