आरोग्य विभागाने ‘पॅरासिटामॉल’सह 156 एफडीसी औषधांवर बंदी घातली  Pudhari File Photo
राष्ट्रीय

‘पॅरासिटामॉल’सह 156 औषधांवर बंदी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नागरिकांच्या आरोग्याला घातक असल्याच्या कारणावरून केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ‘पॅरासिटामॉल’सह 156 एफडीसी (फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन) औषधांवर बंदी घातली आहे. यामुळे आता औषधांच्या दुकानांतून या उत्पादनांची विक्री करता येणार नाही.

याबाबत सरकार आणि आरोग्य विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू होते. लोकांच्या आरोग्याचा विचार करून सरकारने काही निवडक आणि प्रसिद्ध औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांच्या कॉम्बिनेशनचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी माहितीही समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याच महिन्याच्या 12 तारखेला प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सरकारने फार्मा कंपन्यांकडून वेदनाशामक औषधांच्या रूपात वापरण्यात येणार्‍या एसेक्लोफेनाक 50 एमजी+पॅरासिटामॉल 125 एमजी टॅब्लेटवर बंदी घातली आहे. मोठ्या फार्मा कंपन्यांकडून बनवण्यात येणार्‍या वेदनाशामक औषधांमधील हे प्रसिद्ध कॉम्बिनेशन आहे. सोबतच पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन आणि कॅफिन यांच्या कॉम्बिनेशनवरही बंदी घातली आहे. याखेरीज मल्टिव्हिटॅमिनच्या काही औषधांनाही सरकारने बंदीच्या कक्षेत आणले आहे.

एफडीसी औषधे म्हणजे काय?

जी औषधे दोन किंवा अधिक औषधांचे रसायन एका विशिष्ट प्रमाणात वापरून तयार केली जातात, त्यांना एफडीसी म्हटले जाते. सध्या देशामध्ये अशा औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. ताप, सर्दी, अ‍ॅलर्जी, अंगदुखी, डोकेदुखी यांसारख्या किरकोळ आजारांवर ही औषधे गुणकारी म्हणून वापरली जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT