मथुरा; वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल 54 वर्षांनी येथील वृंदावनमधील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिराचा खजिना उघडण्यात आल्यानंतर त्यात रहस्यमय तिजोर्यांसह चांदीच्या तीन, सोन्याची एक छडी आणि तांब्याची काही दुर्मीळ नाणी सापडली आहेत. उच्चाधिकार समितीच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक प्रक्रिया रविवारी पार पडली.
या खजिन्याच्या ठिकाणी एक खोली आढळली आहे. त्याखाली एक तळघर आहे. तेथून खाली जाण्यासाठी पायर्या आहेत. तथापि उच्चाधिकार समितीचे पथक 15 ते 20 फूट खाली उतरू शकले. त्यापुढे ते जाऊ शकले नाही. कारण तो भाग चिखलाने माखलेला होता. मंदिराचे सेवक आणि समितीचे सदस्य शैलेंद्र गोस्वामी यांनी ही माहिती दिली. त्यांनी असेही सांगितले की, बांके बिहारीचा 160 वर्षे जुना खजिना 54 वर्षांनी उघडण्यात आला. यापूर्वी तो 1970 मध्ये उघडण्यात आला होता. रविवारी खोलीच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप ग्राईंडरने कापण्यात आले. खोलीत प्रवेश केल्यावर आम्हाला अंधार, धूळ आणि उग्र दर्प आला. सुमारे पाऊण तास साफसफाई केल्यानंतर तेथे मोठा कलश आणि दोन तिजोर्या सापडला. त्यातील एका तिजोरीत तांब्याची दोन दुर्मीळ नाणी सापडली आहेत. तसेच दुसर्या तिजोरीत चांदीच्या तीन, तर सोन्याची एक छडी सापडली. या छडीची लांबी 4.30 फूट असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत सापडलेल्या सर्वांत महत्त्वाच्या वस्तूंपेक्षा या गोष्टींना विशेष धार्मिक महत्त्व आहे.
खोलीच्या एका कोपर्यात तीन मोठे कलशही ठेवले आहेत. हे कलश पूर्वी बांके बिहारी यांच्यासमोर भाविकांकडून प्रसाद घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. या कलशांमध्ये पूर्वी मौल्यवान चांदी किंवा सोने ठेवले असावे, अशी शक्यता आहे. शनिवारीही या ठिकाणी उच्चाधिकार समितीच्या पथकाने पाहणी केली असता तेथे लाकडी सिंहासन, काही भांडी आणि पेट्या सापडल्या होत्या. या ठिकाणी अचानकपणे सापांची दोन पिल्ले दिसली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या पथकाने त्यांना ताबडतोब पकडले. खजिन्याच्या खोलीत साप आणि विंचू असल्याचा संशय विभागाला आधीच आला होता. त्यामुळे विभागाने साप पकडणारी टीम आधीच सज्ज ठेवली होती. आता या?ठिकाणी सापडलेल्या सर्व वस्तूंची यादी तयार करून त्या सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत.
यापूर्वी 1971 मध्ये या खजिन्याची पाहणी करण्यात आली असता तिथे सापडलेल्या दुर्मीळ वस्तू एकत्र करून त्या स्टेट बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून केलेल्या पाहणीत विविध पेट्यांमधून दुर्मीळ वस्तू आणि सोन्या-चांदीचे अलंकार गायब झाल्याचे दिसून आले आहे. हा मुद्दा आपण उच्चाधिकार समितीच्या बैठकीत उपस्थित करणार आहोत, अशी माहिती मंदिराचे सेवक आणि समितीचे सदस्य शैलेंद्र गोस्वामी यांनी दिली. तसेच याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी कृष्ण जन्मभूमीप्रकरणी याचिका दाखल केलेले दिनेश फलाहारी महाराज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या मते या खजिन्यातील जडजवाहिर आणि अन्य दुर्मीळ वस्तूंवर काही माफियांनी डल्ला मारला आहे.