राष्ट्रीय

बांगला देशही श्रीलंकेच्या वाटेवर

अमृता चौगुले

ढाका; वृत्तसंस्था : भारताचा आणखी एक शेजारी देश बांगला देशातही आता श्रीलंकेप्रमाणे आर्थिक मंदी आणि गरजेच्या वस्तूंचा तुटवडा भासू लागला आहे. शेख हसिना सरकारने पेट्रोल 51.7 टक्के, तर डिझेल दरात 49 टक्के वाढ केली आहे. 1971 मध्ये स्वातंत्र्यानंतर केली गेलेली ही सर्वात मोठी दरवाढ आहे.

इंधन दरवाढीनंतर लोकांमधील राग उफाळून आला असून नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अनेक शहरांमध्ये सरकारच्या या निर्णयाचा विरोध सुरू असून काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली गेली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांनाही मारहाण सुरू आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबारही करावा लागला आहे.

परकीय गंगाजळी आटली

बांगला देशात सध्या पेट्रोल 135 टका प्रतिलिटरवर गेले आहे. 3 ऑगस्ट रोजी बांगला देशकडे 39.67 बिलियन डॉलर परकीय चलन होते. त्यातून 4 ते 5 महिने पेट्रोल-डिझेल आयात करता येईल, एवढेच पैसे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे बांगला देशात कुठल्याही प्रकारच्या आयातीवर मर्यादा येणार आहेत.

सरकारी तेल कंपनीचे मोठे नुकसान

गेल्या सहा महिन्यांत बांगला देश पेट्रोलियम कॉर्पोरेशनला आठ अब्ज टकाचे नुकसान झाले. याशिवाय रशिया-युक्रेन युद्धाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरांत वाढ झाली. त्यामुळे दर वाढविण्याशिवाय काहीच पर्याय राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात किमतीत घट झाल्यावर देशातील दरही कमी केले जातील, असे हसिना सरकारचे म्हणणे आहे.

आयएमएफचा कर्जास नकार

हसिना सरकारने आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे (आयएमएफ) 4 बिलियन डॉलरच्या कर्जाची मागणी केली होती; पण सद्यस्थिती पाहता आयएमएफने बांगला देशला एक बिलियन डॉलरहून अधिक कर्ज देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हसिना सरकारसमोरील अडचणींत वाढच होणार आहे. दरम्यान, हसिना सरकारने या दरवाढीचे खापर रशिया-युक्रेन युद्धावर फोडले आहे.

वीजनिर्मिती केंद्रे बंद

बांगला देशात जूनमध्ये महागाई दर 7.56 टक्के होता. हा गेल्या 9 वर्षांचा उच्चांक होता. त्यावर उपाय म्हणून सरकारने लक्झरी वस्तूंंसह इंधन आयातीत कपात केली. इंधन तुटवड्यामुळे अनेक वीज केंद्रे बंद केली गेली आहेत. त्यामुळे देशात विजेचे संकटही निर्माण झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT