Nursing student killed Bangalore  File Photo
राष्ट्रीय

Crime News: ४ वर्षांचं प्रेम, नर्सिंगचं शिक्षण अन् लॉजवरचा थरार; प्रियकराने २२ वर्षीय प्रेयसीची केली हत्या; कारण धक्कादायकच

दुसऱ्या तरुणाशी जवळीक वाढल्याच्या संशयावरून एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या २२ वर्षीय प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना बेंगळूर येथील एका लॉजवर घडली.

मोहन कारंडे

Nursing student killed Bangalore

बेंगळूर: दुसऱ्या तरुणाशी जवळीक वाढल्याच्या संशयावरून एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या २२ वर्षीय प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी कॉटनपेट परिसरातील एका लॉजवर घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

गंगा (वय २२, रा. अडूर, जि. पठाणमथिट्टा, केरळ) असे मृत तरुणीचे नाव असून, गोकुळ कृष्ण (वय २३, रा. कोल्लम, केरळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा आणि गोकुळ या दोघांनीही 'बीएस्सी नर्सिंग'चे शिक्षण पूर्ण केले आहे.

गंगा आणि कृष्णा यांनी नेलमंगला येथील एका खासगी महाविद्यालयातून 'बीएस्सी नर्सिंग'चे शिक्षण पूर्ण केले होते. तिथे गंगा ही कृष्णाच्या ज्युनिअर होती. गंगा नोकरीच्या शोधात होती, तर कृष्णा नर्सिंगचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांत प्रवेश मिळवून देण्याचे काम करत होता. दोघे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर गंगा आपल्या गावी परतली होती आणि तिने बेंगळूरमधील काही खासगी रुग्णालयांत नोकरीसाठी अर्ज केले होते. गुरुवारी सकाळी दोघे एकत्र बेंगळूरला लॉजमध्ये राहण्यासाठी आले होते.

गंगाची दुसऱ्या एका तरुणाशी वाढलेली मैत्री गोकुळला खटकत होती, यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. शुक्रवारी सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास या दोघांमध्ये पुन्हा याच कारणावरून मोठा वाद झाला. संतापलेल्या गोकुळने चाकूने गंगाच्या पोटावर डाव्या बाजूला सपासप वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

घटनेनंतर गोकुळनेच लॉज कर्मचाऱ्यांना गंगाला उपचाराची गरज असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांनी तातडीने कॉटनपेट पोलिसांना माहिती दिला आणि तिला व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कॉटनपेट पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून खोलीतून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. शहरातील एका दुकानातून हा चाकू खरेदी केल्याची कबुली आरोपीने चौकशीत दिली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT