नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताच्या केंद्रीय औषध नियामकाने (सीडीएससीओ) तीन कफ सिरप बाजारातून परत मागवण्याचे आणि त्यांचे उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यापैकी कोणतेही उत्पादन देशाबाहेर निर्यात केले गेले नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) कळविले आहे. देशात कथित दूषित औषधांमुळे लहान मुलांच्या मृत्यूच्या वाढत्या चिंतेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने जागतिक आरोग्य संघटनेला कळवले की ‘कोल्ड्रिफ’, ‘रेस्पिफ्रेशटीआर’ आणि ‘रिलाईफ’ ही तीन कफ सिरप बाजारातून काढून घेण्यात आली आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लहान मुलांचे आजार आणि मृत्यूच्या घटनांनंतर जागतिक आरोग्य संस्थेने याबद्दल स्पष्टीकरण मागितले होते, ज्याला प्रतिसाद म्हणून ही माहिती देण्यात आली. ‘डब्ल्यूएचओ’ने यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मूत्रपिंड निकामी होणे आणि तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम यासारखी लक्षणे डायइथिलिन ग्लायकॉल किंवा इथिलिन ग्लायकॉलसारख्या विषारी पदार्थांच्या संभाव्य प्रदूषणाशी सुसंगत असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने नमूद केले.
कफ सिरप उत्पादकांची तपासणी आणि ऑडिट करण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी गुरुवारी सांगितले. तसेच, संस्थेने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑडिटसाठी कफ सिरप उत्पादन करणार्या कंपन्यांची यादी देण्यास सांगितले आहे. औषधी उत्पादनांमध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि मानके कायम ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सुधारात्मक आणि प्रतिबंधात्मक कृती मार्गदर्शक तत्त्वांचे अद्याप कोणत्याही राज्याने पूर्णपणे पालन केलेले नाही.
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कथित विषारी कफ सिरपमुळे झालेल्या मुलांच्या मृत्यूचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणात औषध सुरक्षा यंत्रणेच्या अपयशाबाबत दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय सहमत झाले आहे. याचिकेत या घटनांची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर उद्या (दि. 10) सुनावणी होणार आहे.