पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. व्हॉट्स ॲपवर विदेशातील क्रमांकावरून धमकी देण्यात आली आहे. बजरंग पुनिया याने काँग्रेस पक्ष सोडावा. अन्यथा तुझ्यासह कुटुंबाचे भले होणार नाही, हा आमचा शेवटचा संदेश आहे, असे धमकी पत्रही त्याला मिळाले आहे. त्याने सोनीपतमधील बहलगढ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याआधी या दोघांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. विनेश फोगाटला जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर बजरंग पुनिया याला अखिल भारतीय काँग्रेस किसानचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले आहे. बजरंग पुनिया यांनी काँग्रेस आणि देशाला बळकट करणार असल्याचे सांगितले. भाजप आमच्या पाठीशी उभा राहिला नाही. काँग्रेसमध्ये आल्यावर टीका होत आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विनेश फोगट यांनी रेल्वेतील नोकरीचाही राजीनामा दिला होता.