नागपूर : तामिळनाडूतील एका शास्त्रज्ञाला थेट राज्यपाल पदाचे आमिष दाखवून पाच कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंडा घालणारा महाठग निरंजन सुरेश कुलकर्णी (वय 40 वर्ष) रा.गंधर्व नगरी यास नाशिक पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या. आता त्याचा नागपुरात कुणाकुणाची संपर्क आहे याविषयीची चौकशी केली जात आहे. यापूर्वी देखील केंद्रीय पर्यटन विभागाच्या वरिष्ठ पदावर असल्याचे सांगत बड्या नेत्यांच्या नावावर पत्रिका छापून अनेकांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला व त्याला देखील नागपुरातच अटक करण्यात आली.
निरंजनचा मित्र जिल्ह्यातील सावनेरमध्ये राहतो. त्याच्या मदतीने निरंजनने पेंच, बोर व्याघ्र प्रकल्पाजवळ शंभर एकर जागा शासनाकडून लीजवर घेतल्याचे बनावट दस्तऐवज तयार केल्याची माहिती उघड झाली आहे. मित्राने सावनेरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी निरंजन हा शनिवारी उपराजधानीत आला. वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये तो थांबला. दरम्यान, निरंजन नागपुरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने नाशिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला रविवारी दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चेन्नईतील शास्त्रज्ञ नरसिम्हा रेड्डी (वय 56) यांना राज्यपाल पदाची ऑफर देत पाच कोटी आठ लाख रुपये त्यांने उकळल्याची माहिती पुढे आली आहे. इतकेच नव्हे तर 15 कोटींचा सर्व्हिस चार्ज देखील मागितल्याचे पुढे आले. केवळ बारावी शिक्षण असलेल्या निरंजनचे धर्म जागरण कार्यकर्ता म्हणून संघ, भाजप परिवाराशी, राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा गैरफायदा त्याने घेतल्याचे पुढे येत आहे. याच ओळखीचा फायदा घेत अनेकांना गंडा घालत त्याने स्वतः आलिशान, वेगळी छवी निर्माण केली. आता त्याच्यासोबत यासारख्या फसवणुकीत आणखी कोण कोण आहेत याविषयी नाशिक व नागपूर पोलीस तपास करीत आहेत.