पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये हिंसाचार ( Bahraich violence) प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोघे पोलीस चकमकीत जखमी झाले आहेत. मुख्य आरोपी सरफराज उर्फ रिंकू आणि फहीम हे नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आंतरराष्ट्रीय सीमेजवळील हांडा बसेरी कालव्याजवळ ही चकमक झाल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
बहराइचमध्ये दुर्गा विसर्जन दिवशी झालेल्या हिंसाचारात राम गोपाल मिश्रा या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर या परिसरात प्रचंड तणाव वाढला. येथील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी शवविच्छेदनानंतर मृत राम गोपाल मिश्रा यांच्या कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. तसेच जमावाने मृतदेह घेऊन तहसीलमध्ये निदर्शने केली होती.
सरफराज आणि फहीम हे हिंसाचारातील मुख्य आरोपी अब्दुल हमीद यांची मुले आहेत. सरफराज उर्फ रिंकू आणि फहीम यांना नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आंतरराष्ट्रीय सीमेजवळील हांडा बसेरी कालव्याजवळ झालेल्या चकमकीत पायाला गोळी लागली आहे. जखमी आरोपींना आरोपींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. बहराइचमध्ये १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी ANIला सांगितले की, बहराइच हिंसाचारप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलीस भारत-नेपाळ सीमेजवळ त्यांना घेवून शस्त्रास्त्रे जप्तीसाठी घेऊन जात होते. त्यावेळी दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चकमक झाली. या प्रकरणी मोहम्मद सरफराज, अब्दुल हमीद आणि अब्दुल अफजल यांना अटक करण्यात आली आहे.