Badrinath Temple Donation Scam Pudhari
राष्ट्रीय

Badrinath Temple: राम मंदिरानंतर आता बद्रीनाथमध्येही देणगीच्या पैशांवर डल्ला; CCTV तपासणी सुरू, चार कर्मचाऱ्यांना नोटीस

Badrinath Temple Donation Scam: अयोध्येतील राम मंदिरानंतर आता बद्रीनाथ धामातही देणगीतील कथित गैरव्यवहाराचे आरोप समोर आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Badrinath Temple Donation Scam: अयोध्येतील राम मंदिरातील देणगी गैरव्यवहार प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामातूनही अशाच प्रकारचे आरोप समोर आले आहेत. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या (BKTC) एका कर्मचाऱ्यावर देणगीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

धार्मिक संघटना भैरव सेनाने बीकेटीसीला पत्र पाठवून समितीच्या अध्यक्षांच्या वैयक्तिक सहाय्यकावर गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीनंतर बीकेटीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सोहन सिंह रांगड यांनी संबंधित कर्मचाऱ्यांसह ड्युटीवर असलेल्या चार कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून तीन दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे.

CCTV फुटेज तपासणी सुरू

भैरव सेनेचे संस्थापक संदीप खत्री यांनी दावा केला आहे की, 2 जुलैच्या CCTV फुटेजमध्ये समितीतील एक कर्मचारी संशयास्पद हालचाली करताना दिसत आहे. त्यानंतर मंदिर प्रशासनाने संबंधित फुटेज सुरक्षित ठेवत त्याची सखोल तपासणी सुरू केली आहे.

मात्र, CCTV फुटेज झूम केल्यानंतरही चित्र स्पष्ट दिसत नसल्याने संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणताही निष्कर्ष काढण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.

मंदिरातीलच व्यक्तीकडून माहिती?

सूत्रांच्या माहितीनुसार, मंदिर समितीतील काही व्यक्तींनीच भैरव सेनेला देणगी मोजणीमध्ये काही काळापासून अनियमितता होत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर CCTV मध्ये संशयास्पद हालचाली दिसल्याचा दावा करत भैरव सेनेने थेट बीकेटीसीकडे तक्रार दाखल केली.

दोषी आढळल्यास कठोर कारवाई

बीकेटीसीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगितले की, देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यांनी स्पष्ट केले की, ज्याच्यावर आरोप होत आहेत तो त्यांचा वैयक्तिक सचिव नसून बीकेटीसीचा नियमित कर्मचारी आहे. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

राम मंदिर प्रकरणानंतर सुरक्षा वाढवली

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर बद्रीनाथ धामातही सुरक्षा आणि देखरेख वाढवण्यात आली होती. मंदिर परिसरात CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

सीईओ सोहन सिंह रांगड यांनी भाविकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, हे प्रकरण धार्मिक श्रद्धेशी संबंधित असल्याने चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये. सत्य समोर आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

दरम्यान, बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती यापूर्वीही विविध वादांमुळे चर्चेत आली होती. गर्भगृहातील सोन्याच्या पत्र्यांचा रंग उडणे, QR कोडद्वारे देणगी स्वीकारणे, व्हीआयपी दर्शन व्यवस्था आणि काही नियुक्त्यांवरील वाद यांसारख्या प्रकरणांमुळे समितीवर आधीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे या नव्या आरोपांमुळे समितीच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT