बिहारच्या कटिहारमधून एक चांगली बातमी समोर आली आहे. बिहारच्या एका दांपत्याला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दिवशी कन्यारत्न प्राप्त झाले. भारताने दहशतवादविरोधात केलेल्या कारवाईचे कौतुक करत, त्याच्या सन्मानार्थ बिहारच्या या दांपत्याने आपल्या मुलीचे नाव ‘सिंदुरी’ असे ठेवले. बिहारच्या या दांपत्याला भारताच्या या कारवाईचा अभिमान आहे. त्याच प्रीत्यर्थ त्यांनी मुलीला ‘सिंदुरी’ हे अनोखे नावे दिले.
भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यात जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला बहावलपूर आणि लष्कर-ए-तोयबाचा मुरीदके तळ यांचा समावेश आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
कटिहार जिल्ह्यातील कुर्सेला येथील रहिवासी संतोष मंडल आणि राखी कुमारी यांनी त्यांच्या नवजात मुलीचे नाव सिंदुरी ठेवले. ज्या दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवादी तळांविरोधात कारवाई झाली त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा जन्म झाला, असे कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे. आपल्या लेकीने मोठे होऊन सैन्यातील अधिकारी बनून देशसेवा करावी, असे त्यांचे स्वप्न आहे.
भारताने पहलगामचा बदला घेतल्याचा अभिमान असल्याचे या दांपत्याने सांगितले. गेल्या महिन्यात, 22 एप्रिल रोजी पहलगामला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर संपूर्ण देश संतापला. ज्यांनी आपले पती आणि मुले गमावले, त्यांनी न्यायाची मागणी केली. माता-भगिनींचे सौभाग्य हिरावून घेणार्या, त्यांच्या कपाळीचे कुंकू पुसणार्या दहशवाद्यांना कठोर शासन करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई केली. याच कारवाईच्या दिवशी आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले. म्हणून आम्ही तिचे नाव सिंदुरी असे ठेवल्याचे दांपत्य म्हणाले.