चंदीगढ; वृत्तसंस्था : बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेशी संबंधित आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या परमिंदर सिंह ऊर्फ पिंदी या दहशतवाद्याला संयुक्त अरब अमिरातमधून भारतात आणण्यात आले आहे, अशी माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी शनिवारी दिली. पिंदी हा परदेशातील दहशतवादी हरविंदर सिंह ऊर्फ रिंदा आणि हॅपी पैसा यांचा जवळचा साथीदार आहे. केंद्रीय यंत्रणांच्या समन्वयाने त्याला अबू धाबीतून आणण्यात आले आहे.
1) दहशतवादी परमिंदर सिंह ऊर्फ पिंदी याला यूएईतून भारतात आणण्यात आले.
2) तो बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सदस्य असून हरविंदर सिंह ऊर्फ रिंदाचा जवळचा साथीदार आहे.
3) बटाला-गुरदासपूर भागात पेट्रोल बॉम्ब हल्ले आणि खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता.
4) पंजाब पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
डीजीपी यादव यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, पिंदी हा बटाला आणि गुरदासपूर भागात पेट्रोल बॉम्ब हल्ले, हिंसक हल्ले आणि खंडणीसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला होता. बटाला पोलिसांनी विनंती केलेल्या ‘रेड कॉर्नर नोटीस’वर त्वरित कारवाई करत एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय पथक 24 सप्टेंबर रोजी यूएईला गेले होते. परराष्ट्र मंत्रालय आणि यूएईच्या अधिकार्यांशी समन्वय साधून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपीला न्यायासमोर हजर करण्यासाठी यशस्वीरीत्या परत आणले आहे, असे डीजीपी यादव यांनी सांगितले.
परमिंदर सिंह ऊर्फ पिंदी हा 2017 पासून 2023 पर्यंत अनेक वर्षांपासून गुन्हेगारी आणि दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये सक्रिय होता. बटाला-गुरदासपूर परिसरात त्याच्या कारवाया तीव्र झाल्या होत्या. पाकिस्तानस्थित दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा आणि गुंड हॅपी पैसा यांच्याद्वारे चालवल्या जाणार्या ‘टेरर फंडिंग मॉड्यूल’चा तो स्थानिक हँडलर म्हणून ओळखला जात होता.